प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना जिल्हास्तरीय अंमलबजावणी समितीची बैठक
धाराशिव,दि.21( Osmanabad news ): प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेंतर्गत जिल्हास्तरीय अंमलबजावणी समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली.
बैठकीच्या सुरुवातीला जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी डी.व्ही.फताटे यांनी बैठकीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी तसेच उपस्थित अधिकाऱ्यांचे स्वागत केले.शासन निर्णयात आदेशीत केल्याप्रमाणे सर्व ग्रामपंचायती व नगरपालिका,नगर पंचायती क्षेत्रामध्ये या योजनेची व्यापक प्रसिध्दी करावी व स्थानिक स्वराज्य संस्थेकडून लाभार्थ्यांची पडताळणी करावी.प्रशिक्षणाच्या बाबतीत संस्थेचे नियोजन करावे. तसेच Skill India Portal वर जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी,सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य,एस.बी.आय.रेस्टी, कृषी विज्ञान केंद्र यांना सदस्य म्हणून नेमावे व संबंधीत संस्थेचे रजिस्ट्रेशन करावे.जिल्हा अंमलबजावणी समितीतील नियुक्त सदस्यांची नावे कळविण्याबाबत संबंधितांना पत्राद्वारे कळवावे.असेही जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांनी निर्देश दिले आहे.
या योजनेची वेबसाईट pmvishwakarmagov.in या वेब पोर्टलवर सर्व अर्जदारांची नोंदणी करावी.असे आवाहन प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचे सदस्य सचिव तथा जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.