ढोकी येथील तेरणा साखर कारखान्याचे पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते मंगळवारी मोळी पूजन
धाराशिव - उस्मानाबाद : तालुक्यातील ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे मोळी पूजन सोहळा मंगळवारी (दि. १४) दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आयोजित करण्यात आला आहे . राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा . डॉ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते मोळीपूजन होणार आहे .
मराठवाड्यातील सर्वात मोठा कारखाना असा नावलौकीक असलेल्या ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे गाळप तब्बल १२ वर्षापासून बंद होते .जिल्हयाचे पालकमंत्री प्रा.डॉ. सावंत यांच्या भैरवनाथ शुगर्सने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी करार करून हा कारखाना २५ वर्षासाठी भाडे करारावर चालविण्यास घेतला आहे. तेरणा कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा शेतकरी साखर कारखान्याच्या मशिनरी दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली असून कारखाना ऊस गाळपासाठी सज्ज झाला आहे. वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मंगळवारी स . १० वाजता तेरणा कारखान्याचा मोळीपूजन सोहळा पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी तेरणा कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव सावंत,मा.खासदार रविंद्र गायकवाड, ह.भ.प प्रकाश महाराज बोधले कार्यकारी संचालक तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विक्रम (केशव) सावंत , जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्यास शेतकरी सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन श्री. सावंत यांनी केले आहे.