पशुधनाची खरेदी-विक्री करण्यास 1 जूनपासून प्रतिबंधभारत पशुधन प्रणालीवर जनावरांची नोंद अत्यावश्यक

0


पशुधनाची खरेदी-विक्री करण्यास 1 जूनपासून प्रतिबंध, भारत पशुधन प्रणालीवर जनावरांची नोंद अत्यावश्यक

 

धाराशिव,दि.17(जिमाका)  ‘ईअर टॅगिंग' केल्याशिवाय पशुधनाची खरेदी-विक्री करण्यास 1 जून 2024 पासून प्रतिबंध करण्यात आला आहे. पशुधनाची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय पशुधनाची खरेदी किंवा विक्री करता येणार नाही. या पशुधनास पशुवैद्यकीय दवाखान्यामधून मिळणाऱ्या पशुवैद्यकीय सेवाही दिल्या जाणार नाहीत.त्यामुळे सर्व पशुपालकांनी आपल्याकडील लहान मोठ्या सर्व पशुधनाची ईअर टॅगिंग करुन त्याची नोंद पशुधन प्रणाली अॅपवर लवकरात लवकर करावी.असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. वाय.बी.पुजारी यांनी केले.                     

राज्यातील सर्व लहान-मोठ्या जनावरांना ईअर टॅगिंग व त्यांची भारत पशुधन प्रणालीवर नोंद बंधनकारक करणेबाबतचा कृषी, - पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मंत्रालय मुंबई यांचा 27 फेब्रुवारी रोजी शासन निर्णय जाहीर झाला आहे.या निर्णयानुसार भारत पशुधन प्रणालीवर पशुपालकांची सर्व माहिती मोबाईल नंबर,आधार नंबर तसेच पशुपालकाकडे असणारी जनावरांची संपूर्ण माहिती,जनावरांचे वय, लिंग,जात,मिल्कींग स्टेटस् आदी अद्यावत करणे आवश्यक आहे.             

1 जून 2024 पासून ईअर टॅगिंग व भारत पशुधन प्रणालीवरील नोंदीशिवाय जनावरांची खरेदी विक्री करता येणार नाही.तसेच शासकीय पशुवैद्यकीय सेवा दिल्या जाणार नाहीत.केंद्र व राज्य शासनाकडून मिळणारे आर्थिक सहाय्य देय होणार नाही.नैसर्गिक आपत्ती,विजेचा धक्का तसेच वन्य पशुच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम देय होणार नाही.तसेच राज्यातंर्गत जनावरांची वाहतुक करता येणार नाही.तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतुकदारांवर कारवाई करण्यात येणार आहे.जनावरांची मालकी हस्तांतरण करता येणार नाही.वरील सर्व बाबी टाळण्यासाठी सर्व पशुपालकांनी त्यांच्याकडील सर्व जनावरांना नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून ईअर टॅगिंग करून घ्याव्यात. असे जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुजारी यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)