Tuljapur:
शहरातील अवैध धंद्यांविरोधात आंदोलने करून पोलिसांना निवेदने देणारे काँग्रेसचे पदाधिकारी अमोल माधवराव कुतवळ यांच्यावरच मटका व्यवसाय चालविल्याचा गुन्हा दाखल झाल्याने तुळजापूर तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
चार महिन्यांपूर्वी शहरात अवैध धंद्यांबाबत सातत्याने आवाज उठवणारे, पत्रकार परिषद घेत आरोप करणारे आणि निवेदने देणारे कुतवळ यांचे नावच पोलिसांनी शनिवारी रात्री झालेल्या कारवाईत मटका बुकी म्हणून उघड केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
तामलवाडी येथे ड्रग्ज प्रकरणानंतर कुतवळ यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना घेऊन विविध आंदोलनं केली होती. "शहरातील अवैध धंद्यांना कोणाचा आशीर्वाद आहे?" या प्रश्नांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी वारंवार केली होती.
जिल्हा काँग्रेस अध्यक्ष धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाविरोधात निवेदने देत शहरातील अवैध धंद्यांवर कारवाईची मागणी जोरदार केली जात होती. निवेदनांनंतर फोटोसेशन करून प्रसारमाध्यमांत बातम्या प्रसिद्धही करण्यात आल्या.
मात्र, पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी स्वतः पुढाकार घेत खास पथकाद्वारे शनिवारी रात्री हॉटेल राज पॅलेस येथे छापा टाकून कारवाई केली. या छाप्यात मटका व्यवसाय सुरू असल्याचे आढळले व त्यामध्ये काँग्रेस नेते अमोल कुतवळ यांच्यासह भाजपचे विनोद गंगणे आणि सचिन पाटील यांचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी एकूण ३३ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, तक्रार करणारेच अवैध धंद्यात गुंतल्याचे उघड झाल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. “आंदोलनांच्या आडून स्वतःचे धंदे चालवत होते का?” असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.