खताची भाव वाढ व कडधान्य आयात विरोधात बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्षाचे ताली-थाली बजाव आंदोलन- जिल्हाध्यक्ष मयुर काकडे
उस्मानाबाद :- प्रहार च्या वतीने तुर, मूग, उडीद या कडधान्यांची आयात थांबवावी व रासायनिक खतांचे वाढलेले भाव तातडीने कमी करावे या प्रमुख मागणीसाठी २० मे २०२१ गुरुवारी सायंकाळी ६ ते ७ वाजेदरम्यान राज्यभर ताली-थाली बजाव आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात उस्मानाबाद जिल्हातील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रहार उस्मानाबाद यांच्या वतीने करण्यात आले आहे.
यामध्ये दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, भारत सरकारने सन २०२०-२१ साठी कडधान्य आयात खुली केली आहे. मात्र सरकारी विद्यापीठांनी प्रमाणित केले आहे की, भारताकडे हे एकूण ४५ लाख टन तूर ही उपलब्ध होणार आहे. भारताची तुर गरज ४३ लाख टन आहे. म्हणजेच गरजेपेक्षा २ लाख टन तुरीचे जास्त उत्पादन होणार आहे. मात्र केंद्र सरकारने सहा लाख टन तुर आयात केले आहे. केंद्र सरकार तूर मूग व उडीद याच्या आयात आता पूर्णपणे खुली केली आहे. याची अधिसूचना १५ मे २०२१ ला काढली आहे.केंद्र सरकारने मागील तीन वर्षापासून कडधान्य हे प्रतिबंधीत वर्गवारीत होते. ते आता खुल्या वर्गवारीत आल्याने याचा परिणाम शेतकऱ्यावर होणार असून तूर, मूग, उडीद सह इतर कडधान्यांचे भाव जे वाढणार होते ते आता वाढणार नाहीत. उलट हमीभावाच्या खाली हा भाव येऊ शकतो. हा भाव नियंत्रित ठेवण्यासाठी व शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करण्यासाठी ही अधिसुचना रद्द करावी अशी प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी आहे. तसेच यावर्षी देशांमध्ये रासायनिक खताची किंमत ७०० रू वरून ११७५ रु पर्यंत गेली आहे. डी ए पी खताची किंमत १२०० रु वरून १९०० रुपये पर्यन्त गेली आहे. २० : २० : १३ या खताची किंमत ९२५ वरून १३०० रू व १२ : ३२ : १६ खताची किंमत ११४५ रु वरुन १८०० रुपये एवढी प्रचंड भाववाढ झाली आहे. केंद्र सरकारने कोरोणा संकट असताना अचानक खताचे भाव वाढून शेतकऱ्यांना मानसिक व आर्थिक त्रास दिला आहे. कोरोणा कारणाने शेतकऱ्यांच्या उत्पादनावर खूप मोठा परिणाम झाला असून त्याचे उत्पन्न घटले आहे. या आयात धोरणांमुळे शेतमालाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न घटले असताना रासायनिक खतांच्या किमती मध्ये मोठ्या प्रमाणात झालेली वाढ ही शेतकऱ्यांसाठी त्रासदायक आहे. म्हणून या रासायनिक खताची किंमत कमी करावी अशीही मागणी प्रहार जनशक्ती पक्षाची आहे.
या प्रमुख मागण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वतःच्या घरासमोर, गच्छीवर कोरोणा नियमाचे पालन करून थाली- टाळी बजाव आंदोलनामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांनी केले आहे.