सावधान! बायोडिझेलच्या नावाने राज्यात काळा बाजार : भेसळ करून होतेय डिझेलची विक्री!
उमरगा (महादेव पाटील)
केंद्र सरकारने बायोडिझेल (बी १००) विक्रीला परवानगी दिल्याची संधी साधून बायोडिझेलच्या नावाने विविध इंधन भेसळ करून कमी दरात बायोडिझेल विक्रीचा नवा गोरखधंदा सीमावर्ती, चौरस्ता भागात फोफावत आहे. डिझेलपेक्षा २० ते २५ रुपये स्वस्त बायोडिझेल मिळत असल्याने अनेक वाहनधारक या इंधनाचा वापर करत आहेत. प्रत्यक्षात फक्त बायोडिझेलवर वाहन चालूच शकत नसल्याने या डिझेलमध्ये कशाची भेसळ होते, हे पाहणे आवश्यक आहे. हा काळा बाजार दिवसेंदिवस वाढत असल्याने इंधनापोटी मिळणाऱ्या कोट्यवधींच्या महसुलावर शासनाला पाणी फेरावे लागत आहे.
डिझेल टाकल्यानंतर ठराविक लिटर प्रमाणात १० ते २० टक्के बायोडिझेल टाकून वाहन वापर केला पाहिजे. जैविक कचऱ्यापासून (जेट्रोफा, खराब तेल, अमोनिया, मॉलेसेस आदी) बायोडिझेलची निर्मिती होते. विशेष म्हणजे या सर्व इंधनाचे गुजरात कनेक्शन दिसून येते. गुजरातमध्ये बायोडिझेल विक्रीचे एक हजाराहून अधिक पंप सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे डिझेलवर २१ टक्के व्हॅट, अबकारी कर, दुष्काळी कर यासह विविध प्रकारच्या एकत्रित करांची रक्कम ४७ टक्के आहे. यातून शासनाला मोठा महसूल मिळतो. याउलट बायोडिझेलवर फक्त १८ टक्के जीएसटी आहे. त्यात परतावा मिळत असल्याने अनेकांचा ओढा बायोडिझेलकडे आहे. काही मोठे ट्रान्स्पोर्ट चालक, व्यावसायिक व इंधन काळा बाजार करणारे सर्रासपणे बायोडिझेलचा वापर करीत आहेत.
डिझेलच्या ३० टक्के मार्केटवर बायोडिझेल पंपाने कब्जा केला आहे. त्यामुळे राज्य सरकार व पेट्रोल पंप डीलरचे नुकसान होत आहे. एकीकडे तेल कंपन्यांनी बीएस-६ वाहनांसाठी पेट्रोल-डिझेल तयार करण्यासाठी ७४ हजार कोटी रुपये खर्च करून रिफायनरीचे आधुनिकीकरण केले आहे. दुसरीकडे बायोडिझेलची अवैध पद्धतीने विक्री होत असल्याने तेल कंपन्यांचे सुद्धा नुकसान होत आहे.डिझेलपेक्षा बायोडिझेल हे २० ते २५ रुपये स्वस्त आहे. बायोडिझेल विक्रेते डिझेल, बायोडिझेल व फ्युएल ऑइल या तिन्हींची भेसळ करून बायोडिझेलच्या नावाने डिझेलसदृश इंधन विक्री करीत आहेत.
बायोडिझेलची डेन्सिटी तपासली असता डिझेलप्रमाणेच येते. यातूनच भेसळ असल्याचे स्पष्ट होते. विशेष म्हणजे बायोडिझेल पंपासाठीही पेट्रोलपंपाप्रमाणेच जिल्हाधिकाऱ्यांसह प्रदूषण नियंत्रण मंडळ व अन्य विविध विभागांच्या ११ प्रकारच्या परवानग्या घेणे आवश्यक आहे.
विविध इंधनांची डेन्सिटी
पेट्रोल - ७०० - ७५०
डिझेल - ८२० - ८४०
बायोडिझेल - ८६० - ९००
फ्युएल ऑइल - ७८० - ८००