महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तुळजापूर येथे वास्तव्य आहे. तुळजापूर हे गाव सोलापूर – औरंगाबाद रस्त्यावर आहे. सोलापूरहून ४२ कि.मी. तर उस्मानाबादहून २२ कि.मी. अंतरावर आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देउन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद देणारी तुळजापूरची ही देवी भवानी माता महिषासुर मर्दिनी, तुकाई, रामवरदायिनी, जगदंबा आदी नावानी ओळखली जाते. जगदंबा मातेची मूर्ती गडकी शिळेची असून ती अष्टभुजा आहे. आश्विन व चैत्र पूर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते. यात्रेला देशभरातून लाखो भाविक येत असतात.