महामानव डॅा.ए.पी.जे.अब्दुल कलाम : असामान्य,अलौकिक व्यक्तिमत्त्व(15 ऑक्टोबर जयंती विशेष लेख )

0
महामानव डॅा.ए.पी.जे.अब्दुल कलाम : असामान्य,अलौकिक व्यक्तिमत्त्व(15 ऑक्टोबर जयंती विशेष लेख )


"यशकिर्तीच्या पाऊलखुणा , जाणुया आपण सारे,
जिद्द , चिकाटी , नम्रता या सदगुणांचे अंगी बाणवु वारे, 
कर्तृत्वाची खाण आपली ध्येयपूर्तीचे इशारे गड जिंकुनी,
अडचणींतही वाजवु यशाचे नगारे" महामानव
डॉ .ए.पी.जे. अब्दुल कलाम  प्रतिभावान , अलौकिक कार्यानं अवघ्या विश्वावर अमीट ठसा उमटवतात .आदरणीय डॉ . कलाम हे खरोखरच एक असामान्य कर्मयोगी आणि तेजपुंज व्यक्तिमत्त्व होतं . त्यांचं निसर्ग आणि मानवतेवर विलक्षण प्रेम होते . विनयता , कठोर परिश्रम आणि साधेपणासाठी आयुष्यभर ओळखले जाणारे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पैसा अथवा वंशाने नव्हे तर आपला प्रेमळ स्वभाव आणि आदर्श वागणुकीमुळे दिग्गज व्यक्तींच्या पंक्तीत विराजमान झाले . डॉ . कलाम यांचं बालपण तुमच्या - आमच्यासारखं अतिशय सर्वसामान्य होतं . अभ्यासाची त्यांची विशेष जवळीक होती . ते जसजसे मोठे होत गेले , तसतसे निसर्ग आणि विज्ञान विषयाप्रती त्यांचं आकर्षण वाढतच गेलं . झाडाच्या पानांची हळूवार सळसळ , पक्ष्यांचा सुमधूर किलबिलाट , नदीचं झुळझुळ वाहणारं पाणी आणि अथांग पसरलेला आसमंत त्यांना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सतत प्रेरित करत राहिला . त्यातूनच त्यांच्या मनात स्वत:च्या आयुष्यात काहीतरी विशेष आणि उदात्त करून दाखवण्याची दाट उर्मी निर्माण झाली . त्यांनी जिद्द आणि अथक परिश्रमांच्या जोरावर  स्वत : हे स्वप्न साकार केलं.भारताच्या दक्षिणेकडे असणाऱ्या तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम् या नितांत सुंदर समुद्रकिनारा लाभलेल्या गावात कलामांचा जन्म झाला. सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमीत जन्मलेल्या कलामांच्या डोळ्यात स्वप्नांचा  अथांग महासागर होता. त्यांचा महत्त्वाकांक्षेशी लहानपणापासूनच परिचय असावा , तीक्ष्ण बुद्धिमत्तेचं वरदान मिळालेल्या कलामांनी या स्वप्नांकडे झेप घेण्यासाठी कठोर परिश्रम घेतले . त्रिची येथील सेंट जोसेफ महाविद्यालयातून विज्ञान विषयात पदवी घेतल्यानंतर कलामांनी ' मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी' मधून एरॉनॉटिकल इंजिनियरिंगच शिक्षण पूर्ण केलं . पुढे भारतीय अवकाश इतिहासातील उत्तुंग व्यक्तिमत्त असलेल्या विक्रम साराभाई यांच्याबरोबर काम करण्याची कलामांना संधी मिळाली . रोहिणी , अग्नी , त्रिशूल , पृथ्वी अशा अनेक सॅटेलाईटस् आणि मिसाईलच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा होता . साहजिकच भारताचे ' मिसाईल मॅन ' म्हणून कलाम जगविख्यात झाले .

            चेन्नईच्या अण्णामलाई विद्यापीठातून कलामांनी प्राध्यापक आणि संशोधक म्हणून काम केलं . भारतीय तरुणाईवर त्यांचा गाढा विश्वास होता . उद्याच्या सामर्थ्यवान भारताचं स्वप्न या तरुणाईत रुजवण्यासाठी कलामांनी स्वत :ला अक्षरश : झोकून दिलं . बहुतांश वेळ ते मुलांच्याच गराड्यात राहत.लहान मुलं आणि तरुणाईचा सहवास त्यांना नवी उर्जा देत असे . मुलांना प्रेरित करण्यासाठी कलामांनी अनेक उत्तमोत्तम पुस्तकं लिहिली , ज्यांचा विविध भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे . डॉ . कलाम नेहमी म्हणायचे , " जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही , स्वत : बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करून दाखवा . स्वत : ला सिद्ध करा . अब्दुल कलाम हे भारताच्या अत्यंत प्रतिभाशाली शास्त्रज्ञांपैकी एक होते . तब्बल ४८ भारतीय आणि विदेशी विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेट देऊन सन्मानित केलं आहे . डॉ . कलामांनी अध्यात्म आणि विज्ञान यांचा विचार अतिशय चिकित्सक पद्धतीने केला . त्यांनी विज्ञानाचा धागा कलेमध्ये अतिशय चपखलपणे विणला , साहित्य आणि विज्ञान हे पैलू नेहमीसाठी त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग ठरले . विज्ञानातील प्रत्येक नवनिर्मितीच्या टप्प्यावर त्यांचं सृजनशील मन कागदावर शब्दांची सुंदर उधळण करीत असे . आपल्या अंतर्मनाशी प्रामाणिक राहत ठरवलेली उद्दिष्ट पूर्ण करणं तर जणू त्याच्या स्वभावातच भिनलं होतं . सतत असलेला नावीन्याचा ध्यासच त्याचं वेगळेपण सिद्ध करत असे . स्वत : कडे उपलब्ध असलेल्या वेळेतील क्षणाक्षणाचा सदुपयोग करत ते संशोधनात भान हरपून जातं. इतकी प्रचंड एकाग्रता हेच त्यांच्या अद्वितीय यशाचं मुख्य कारण होतं .
         १९८१ मध्ये ' पद्मविभूषण ' या पुरस्कारांनी गौरवण्यात आलेल्या या महान शास्त्रज्ञाला १९९७ मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान  ' भारतरत्न ' या पुरस्काराने गौरवण्यात आलं . डॉ .ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या गुणवत्तेला आंतरराष्ट्रीय पातळीवरही असंख्य मानसन्मान मिळाले . ' रॉयल सोसायटी , युके तर्फे किंग चार्ल्स  मेडल ' , रॉयल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग लंडन तर्फे ' इंटनॅशनल मेडल २००८ ' , हूव्हर बोर्ड ऑफ अवॉर्डस् ' तर्फे ' व्ह्यूह मेडल २००८ आणि वूड्रो विल्सन अवॉर्ड २००८ ' यांसारख्या अनके नामांकित पुरस्कारांनी कलामांच्या उत्तुंग कार्याचा सन्मान करण्यात आला .

देशाचे अकरावे राष्ट्रपती म्हणून काम करताना डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलामांनी भारताच्या नावाला आंतरराष्ट्रीय क्षितिजावर एक नवी ओळख मिळवून दिली . डॉ. अब्दुल कलाम म्हणजे साध्या राहणीचं एक मूर्तिमंत उदाहरण होतं . सभ्यता , सुसंस्कृतता आणि विद्वत्ता याचा अनोखा मिलाफ त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सहज जाणवत असे . विज्ञान विश्वातील या ध्रुवताऱ्याची अध्यात्मिकतेवरही अपार श्रद्धा होती . सर्वधर्मसमभावाचे संस्कार त्यांच्यावर लहानपणापासूनच झाले होते . प्रामुख्याने संगीत आणि वीणावादन हे त्यांचे उर्जास्रोत्र होते . भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी दाखवलेलं विकसित भारताचं स्वप्नं साऱ्या देशवासीयांना सदैव प्रेरणा देत राहील . डॉ.कलामांनी संपूर्णपणे विकसित झालेल्या भारताचं सोनेरी स्वप्न आयुष्यभर बाळगलं . २०२० पर्यंत भारतानं  महासत्ता होऊन साऱ्या जगासामोर आपला आदर्श ठेवावा , अशी त्यांची मनोमन इच्छा होती . तरुणाईच्या क्षमतेवर तर कलामांचा दृढ विश्वास होता . आपली पात्रता आणि कार्यकौशल्याच्या बळावर लवकरच भारतातील तरुण, तरुणी आपल्या देशाला यशाच्या  सुवर्णयुगात घेऊन जातील , जेथे गरीब , अशिक्षितपणा आणि जातिभेदाला अजिबात थारा नसेल असं कलामांचं ठाम मत होत . त्यामुळेच अखेरपर्यंत ते तरुणाईला आपल्या अनुभवाची आणि ज्ञानाची शिदोरी नि : स्वार्थ मनानं वाटत राहिले . कला ही जीवनातील सौंदर्य अत्यंत उदार रूपात व्यक्त करते , मानवी अस्तित्वाला अर्थ आणि गहनता देते आणि जीवन ज्या हेतूसाठी उत्क्रांत झालं आहे . त्या हेतूला न्याय देते ' असं कलाम साहेबांचं परखड मत असायचं ! १९५८ साली अब्दुल कलामांनी वैमानिक अभियांत्रिकी पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी भारतीय वायुसेनेत आणि संरक्षण मंत्रालयात तांत्रिक विकास व उत्पादन विभागात काम करण्यासाठी अर्ज केले .  डी.टी.डी अॅण्ड पी.मध्ये  निवड झाली आणि मग तिथेच त्यांना सहाय्यक वैज्ञानिक पदासाठी त्यांना निवडलं गेलं . कलाम साहेबांनी तो पदभार स्वीकारला आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या नाविन्यपूर्ण आणि देशहितकारक अशा संशोधक प्रवासाला सुरुवात झाली . डॉ . कलाम एके ठिकाणी म्हणतात ," शिक्षक फक्त ज्ञानदानच करत नाहीत , तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देण्यासाठी त्यांच्यात एक महान शिक्षक - मार्गदर्शकही दडलेला असतो" . डॉ . कलाम  हे खऱ्या अर्थानं देशभक्त होते . त्यांच्या देशभक्तीचा सुगंध त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांतील सुवर्णाक्षरांनी साऱ्या जगभर दरवळत आहे . आपल्या सहीचं रूपांतर स्वाक्षरित झालं की , आपण यशस्वी झालो असं समजायला काही हरकत नाही ' असं कलाम  नेहमी म्हणायचे . प्रामुख्याने अडचणी सगळ्यांनाच असतात ; यशस्वी आणि अयशस्वी व्यक्तींमध्ये फरक असतो तो दृष्टिकोनाचा ! हाच दृष्टिकोन आणि त्याची प्रभावकारक , प्रगल्भता डॉ.कलामांनी जाणीवपूर्वक जपली ,अंगीकारली आणि आपल्या राष्ट्राच्या हितार्थ स्वत:ला निसंदिग्धपणे वाहून घेतले . आयुष्यभर अविवाहित आणि शाकाहारी असलेले डॉ.कलाम  हे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्त्व होते. शिवाय तरुणाईच्या भविष्याची काळजी करणारं सर्वांचं लाडकं चालतं बोलतं विद्यापीठ होतं . देशाच्या पुनरुत्नथानासाठी नि:संकोचपणे झटणारे एक निखळ आणि सत्कर्मी व्यासपीठ होतं .त्याच विद्यापीठाकडून, व्यासपीठाकडून या आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्त्वाकडून आपल्या भारतीय तरुणाईने काहीतरी प्रभावी आणि देशहितास परिणामकारक असं शिकण्याची गरज आहे .आपल्याचं भारतातील काही बोटावर मोजण्याइतके शास्त्रज्ञ , अभियंते हे जास्त पैशांच्या लोभापोटी परदेशात वर्षानुवर्षे नोकरी करतात . भारत हा देश आज जागतिक लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे .२०२१ च्या जनगणनेत कदाचित प्रथम क्रमांकारही असेल , परंतु हीच सुशिक्षित आणि सज्ञान लोकसंख्या आपल्या देशाच्या प्रगतीचं एक प्रमुख स्त्रोत होऊ शकतो .आपली माती , मायभूमी सोडून परकीय देशांना आपल्या अमुल्य बुद्धीचे प्रदर्शन करणे डॉ . कलामांना मुळीच आवडत नसे . डॉ . कलाम  त्यांच्या भाषणात कित्येकवेळा ही गोष्ट बोलूनही दाखवली आहे . डॉ . कलाम  हे मनाने खूप संवेदशील व सोज्वळ शिवाय साधे होते . त्यांना रुद्रवीणा वाजवण्याचा व मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता . देशाचे ११ वे राष्ट्रपती म्हणूनही त्यांनी कारभार पाहिला . त्यांचा या अलौकिक आणि अभुतपूर्व कार्याबद्दल पद्मभूषण ' , ' पद्मविभूषण ' आणि ' भारतरत्न ' या महत्त्वाच्या पुरस्कारांनी  गौरवण्यात आले . मी इथे त्यांचं कार्य आणि पुरस्कार यासाठीच पुन्हा उल्लेख केले,कारण , भारत हा तरुणांचा आणि कणखर शिवाय बुद्धिवादी मेंदूंचा देश आहे , असे अनेक निष्कर्षाअंती समोर आले आहे . डॉ . कलाम  हे क्षितिजाच्याही पलीकडं अगदी उंच यशाची भरारी मारणारे पहिले अभिव्यक्ती आहेत . आजच्या तरुणाईने डॉ . कलाम साहेबांच्या आचार विचारांचे विचारपूर्वक आचरण केले पाहिजे . डॉ . कलाम यांची समाजमनाशी असलेली अतुट नाळ ही अगदी त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत जोडलेली होती . शिलाँग येथील आय.आय.एम.च्या कार्यक्रमात व्याख्यान देत असताना तब्येत बिघडली . शिलाँगमधीलच एका रुग्णालयात त्यांनी २७ जुलै २०१५ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला . डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे भारतातील तसेच वैज्ञानिक क्षेत्रातील कार्य खूप मौल्यवान आहे आणि याच महामानवाचा जन्मदिवस १५ ऑक्टोबर हा ' वाचन प्रेरणा दिन ' म्हणून साजरा केला जातो . या साक्षात देवरुप अभिव्यक्तीस त्रिवार वंदन करतो....

    प्रा.डॉ.तुळशीराम उकिरडे
 सहाय्यक प्राध्यापक,मराठी विभाग 
  तेरणा महाविद्यालय,उस्मानाबाद
      9881103941


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top