लोहारा येथे जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

0



लोहारा  / प्रतिनिधी दि 12


 राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती लोहारा शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश स्कुल मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी सभापती दयानंद गिरी, प्रमुख पाहुणे म्हणून जिजाऊ ब्रिगेड लोहारा तालुकाध्यक्ष रांजनाताई हासुरे, आम्रपाली क्षीरसागर स्कूलच्या संचलिका सविता जाधव, मुख्याध्यापक शहाजी जाधव, श्रीकांत हासूरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात  आले.व  त्यानंतर सर्व पाहुण्यांचे स्कुलच्या वतीने जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांचे जीवनचरित्राचे  पुस्तक व पुष्पगुच्छ भेट देवून स्वागत करण्यात आले. 


याप्रसंगी  मार्गदर्शनपर बोलताना रंजनाताई म्हणाल्या की,आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत, यामध्ये सर्वात मोठा वाटा हा राजमाता जिजाऊसाहेब यांचा आहे कारण त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतहि न डगमगता स्वराज्य स्थापनेसाठी छ. शिवरायांवर  संस्कार केले, आता आपण स्वतंत्र भारत देशात राहत आहोत तरीही आपण आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्यात कमी पडतो आहोत. स्वराज्य जननी जिजाऊ यांची प्रेरणा घेवून सर्व महिलांनी समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा. 

अध्यक्षीय भाषणात दयानंदजी म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील धर्म परिषदेमध्ये उपस्थिताना बंधू आणि भगिनींनो असे शब्द उद्गरून जगाला बंधुत्वाची भावना जपणारा संदेश दिला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी जिजाऊ आणि विवेकानंद यांच्या वेशभूषा करून अभिवादन केले. याप्रसंगी स्कूलमधील सिद्धेश्वर सुरवसे, परमेश्वर जाधव, हारून हेड्डे,, मयुरी नारायणकर, मीरा माने, सोनाली बिडवे व इतर शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानी बिडवे आणि आभार प्रदर्शन व्यंकटेश पोतदार यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top