Osmanabad news :-
बसवंतवाडी शाळेत स्वयंशासन दिन उत्साहात साजरा
तुळजापूर ( दि.14) वार्ताहर : तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता आठवी च्या विद्यार्थ्यांचा दरवर्षी प्रमाणे स्वयंशासन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी छात्र मुख्याध्यापक म्हणून कुमारी श्रद्धा मुळूक व छात्र उपमुख्याध्यापक म्हणून अभिजीत शिंदे यांनी कामकाज पाहिले
इयत्ता आठवीच्या 24 विद्यार्थ्यांनी पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना सहा तास सर्व विषयाचे नेमून दिलेल्या वेळापत्रकानुसार अध्यापन करून अध्ययन अध्यापनाचे कार्य पूर्ण केले.
त्यानंतर सातवी व आठवी च्या विद्यार्थ्यांना सातवीच्या विद्यार्थ्यांमार्फत पोहे, गुलाब जामून व कचोरी हे मिष्टान्न भोजन देण्यात आले.
यावेळी इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात आज झालेल्या दिवसभरातील घडामोडी वर्णन केल्या.
तसेच इयत्ता आठवी मधील अभिजित शिंदे यांनी शिक्षकाची महत्त्वाची भूमिका कशी असते या बद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच सर्व शिक्षकांनी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेसाठी पंचवीस रोपासहित कुंड्या भेट देऊन एक अनोखा उपक्रम प्रा शा वसंतवाडी येथे सूरु केला.
हे वृक्ष पुढील कालावधीत सर्व विद्यार्थ्यांनी जतन करावीत व शाळेमध्ये वृक्षलागवडीचे असेच प्रयत्न चालू ठेवावेत असे आपल्या भाषणातून चौधरी प्रमोद यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
शालेय शिस्तीचे पालन करून पुढील आयुष्यात आपली भरभराट व्हावी अशी सदिच्छा व्यक्त करत दिपक ढोणे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्रीमंत टेंगळे, इयत्ता आठवीचे वर्गशिक्षक प्रमोद चौधरी, शिक्षक दिपक ढोणे, राजकुमार घोडके, धोंडीबा गारोळे, रामचंद्र शिंदे व सुसेन सुरवसे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी बनसोडे तर आभार ज्ञानेश्वर शिंदे याने मानले.