हिवताप प्रतिरोध महिना जून 2022 या महिन्यात दर वर्षी प्रमाणे याही वर्षी जिल्हयातील सर्व गावात आणि शहरी भागात राबविण्यात येणार आहे. प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये पाऊस सुरु होतो. पावसाचा जून ते सप्टेंबर हा काळ हिवताप आणि इतर किटकजन्य आजारासाठी पारेषण काळ आहे. या काळामध्ये डबके, नाल्या, खड्डे इत्यादी ठिकाणी पाणी साचते आणि डासोत्पत्ती होते. पर्यायाने किटकजन्य आजार वाढतात. त्या अनुषंगाने लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि डासोत्पत्ती स्थाने नष्ट करावीत. तसेच किटकजन्य आजारापासून आपले कसे संरक्षण करावे इत्यादी माहिती या हिवताप प्रतिरोध मोहीम अंतर्गत प्रत्येक वर्षी आरोग्य खात्या मार्फत दिली जाते.
किटकजन्य आजारामध्ये डास या किटकापासून होणाऱ्या आजारामध्ये प्रामुख्याने हिवताप, डेंग्यु, चिकुनगुनीया, हत्तीरोग आदी अजाराचा समावेश होतो. या सर्व आजाराचा प्रसार डासांच्या मादी मार्फत पसरविला जातो.
हिवताप आजाराची लक्षणे : थंडी वाजून ताप येणे, सतत ताप, एक दिवसा आड ताप येणे, नंतर घाम येवून अंग गार पडते, डोके दुःखते, बऱ्याच वेळा उलटया होतात.
हिवतापः- हिवताप आजाराचे निदान कशा प्रकारे केले जाते. हिवतापाच्या निश्चीत निदानासाठी तापाच्या रुग्णांचा रक्त नमुना घेवून तो सुक्ष्म दर्शकाखाली तपासणी आवश्यक असते. त्याकरिता कार्यक्षेत्रामध्ये आरोग्य खात्यामार्फत आरोग्य सेवक, सेविका यांच्या मार्फत दैनंदिन ताप रुग्ण सर्वेक्षणात ताप आलेल्या रुग्णांचे रक्त नमुना घेवून आणि आरोग्य संस्थेमध्ये येणाऱ्या ताप रुग्णांचे रक्त नमुने संकलन करुन तपासणी करीता नजीकच्या प्रयोग शाळेत पाठविले जातात आणि प्रयोग शाळेमध्ये तात्काळ निदान केले जाते.
हिवताप आजारावर उपचार : प्रयोग शाळेमध्ये तपासणी अंती आढळून आलेल्या हिवताप दुषीत रुग्णांस जंतूच्या प्रकारानुसार आणि वयोगटानुसार क्लोरोक्वीन व प्रायमाक्वीन गोळयाचा समूळ उपचार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली देण्यात येतो. व्हायव्हॅक्स हिवताप रुग्णांस 14 दिवस तर फॅल्सीफेरम हिवताप रुग्णांस 3 दिवस संपूर्ण समूळ उपचार देणे अंत्यत आवश्यक आहे.
डेंग्यु:
डेंग्यू हा कोणत्या प्रकारचा आजार आहे ? डेंग्यू हा डासामुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे.
डेंग्यू कसा पसरतो ? डेंग्यूचा विषाणू एडिस डासाच्या मादीमुळे पसरतो.
डेंग्यूची लक्षणे - तीव्र ताप, डोकेदुखी, उलटी, अंगदुखी आणि डोळयाच्या खोबणीमध्ये दुखणे.
डेंग्यूवरील उपाय - डेंग्यूवर कोणताही ठोस नेमका उपचार नाही. तापासाठी पॅरासिटामोल, भरपूर पाणी पिणे, विश्रांती आणि लक्षणानुसार उपचार.
हत्तीरोगः-
हत्तीरोगोचा प्रसार हा क्युलेक्स मादी डासामार्फत होतो. क्युलेक्स डासाची उत्पत्ती ही घाण पाणी, गटारी, सेप्टीक टॅंक इत्यादी ठिकाणी होते. या आजारामुळे शरीराला कायमचे अपंगत्व येते.
जिल्हामध्ये रुग्णांचे निदान करण्याकरिता दोन हत्तीरोग रात्र सर्वेक्षण पथक उमरगा आणि मुरुम येथे कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत त्या भागातील गावाचे रात्र सर्वेक्षण करून रक्त नमुने संकलन करून आणि रक्ताची तपासणी करून रोग निदान केले जाते आणि त्यांना वयोगटानुसार उपचार करण्यात येतो.
2019 ते मे 2022 अखेर रक्त नमुने तपासणी आणि दूषीत रुग्णांची माहिती :-
2019 मध्ये हिवतापासाठी एकूण 3 लाख 34 हजार 515 रक्त नमुने तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 2 हिवताप रुग्ण आढळून आले. 2022 मध्ये 2 लाख 28 हजार 490 रक्त नमुने तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एक हिवताप रुग्ण आढळून आलेला आहे. 2021 मध्ये एक लाख 75 हजार 195 रक्त नमुने तपासणी केली. त्यामध्ये एक हिवताप रुग्ण आढळून आलेला आहे. तसेच 2022 मध्ये 86 हजार 418 रक्त नमुने तपासणी करण्यात आली त्यामध्ये एकही हिवताप रुग्ण आढळून आलेला नाही.
2019 मध्ये डेंग्यु चिकुनगुनीयासाठी एकूण 383 रक्त जल नमुने तपासणी करण्यात आली. त्यामध्ये डेग्यु रुग्ण 48 आणि चिकुनगुनीया 48, 2020 मध्ये डेंग्यु चिकुनगुनीयासाठी एकूण 185 रक्त जल नमुने तपासणी करण्यात आली. त्यामध्ये डेग्यु रुग्ण 18 आणि चिकुनगुनीया 16 रुग्ण, 2021 मध्ये डेंग्यु चिकुनगुनीयासाठी एकूण 418 रक्त जल नमुने तपासणी करण्यात आली त्यामध्ये डेंग्यु रुग्ण 60 आणि चिकुनगुनीया 20, 2022 मध्ये मे 2022 अखेर डेंग्यु चिकुनगुनीयासाठी एकूण पाच रक्त जल नमुने तपासणी करण्यात आली त्यामध्ये डेंग्यु रुग्ण निरंक आणि चिकुनगुनीया एक आढळून आलेला आहे.
2019 मध्ये हत्तीरोग तपासणी करीता रात्र सर्वेक्षणाद्वारे उमरगा येथे 2019 मध्ये 17 हजार 106 रक्त नमुने तपासणी मध्ये 3 ( एम एफ दूषीत रुग्ण ) आढळून आले. 2020 मध्ये 6 हजार 782 रक्त नमुने तपासणी मध्ये एम एफ रुग्ण निरंक आहेत, 2021 मध्ये 10 हजार 914 रक्त नमुने तपासणी मध्ये एम एफ रुग्ण निरंक आहेत, 2022 मध्ये मे 2022 अखेर 6 हजार 272 रक्त नमुने तपासणी मध्ये एम एफ रुग्ण निरंक आहेत.
2019 मध्ये हत्तीरोग तपासणी करीता रात्र सर्वेक्षणाद्वारे मुरुम येथे 2019 मध्ये 16 हजार 670 रक्त नमुने तपासणी मध्ये एम एफ रुग्ण निरंक आहेत. 2020 मध्ये 10 हजार 467 रक्त नमुने तपासणी एम एफ रुग्ण निरंक आहेत, 2021 मध्ये 10 हजार 966 रक्त नमुने तपासणी मध्ये एम एफ रुग्ण निरंक आहेत, 2022 मध्ये मे 2022 अखेर 6 हजार 780 रक्त नमुने तपासणी मध्ये एम एफ रुग्ण निरंक आहेत. सर्व दूषीत रुग्णांस समूळ उपचार देण्यात आलेला आहे.
• किटकजन्य आजार प्रतिबंधा करिता आपण जनतेस काय अव्हान कराल :
ताप आल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रात जावून तपासणी करुन औषधोपचार घ्यावा.
परिसर स्वच्छता :- घराभोवती, परिसरात ज्यामध्ये पाणी साचू शकेल अशा निरुपयोगी वस्तू साचू देऊ नये. त्या नष्ट कराव्यात. खराब टायर्स पंक्चर्स करावेत. पंक्चर दुकानातील टायर्स त्यात पाणी साठणार नाही, अशा पध्दतीने रचावेत. पाण्याची भांडी, ड्रम, रांजण व्यवस्थित झाकून ठेवावेत. झाकण नसल्यास जुन्या कपडयाने झाकावेत. पाण्याची भांडी झाकल्याने त्यात डास अंडी घालू शकत नाहीत. तसेच अंडयाची वाढ होण्यासाठी हवा, प्रकाश मिळू शकत नाही. घरावरील टाक्यांना झाकणे बसवा. शौचालयांच्या व्हेंट पाईपला जाळी बसविणे.
आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळणे :- या दिवशी घरातील सर्व भांडी मोकळी करुन घासून पुसून घ्यावीत. परिसरातील डबकी वाहती करणे, बुजविणे, मोठया डबक्यात गप्पीमासे सोडणे. जे कंटेनर रिकामे करता येणार नाहीत. उदा. सिमेंटचे कंटेनर अशा कंटेनरमध्ये टेमिफॉस या अळीनाशकाचा वापर करावा. तसेच डासांपासून बचाव करणेसाठी अंगभरुन कपडे घालावेत. मच्छरदाणी आणि रासायनिक क्चाईलचा आदींचा वापर करावा.
जिल्हा हिवताप अधिकारी
उस्मानाबाद