खा. शरद पवार हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढे घेऊन जात आहेत - महेबुब शेख

0
 


खा. शरद पवार हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढे घेऊन जात आहेत - महेबुब शेख

आ.राणा पाटलांवर खेकड्याच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली

उस्मानाबाद दि.२ (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख खा. शरद पवार हे कोणत्याही एका जातीचे नसून तो एक विचार आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जातीसमूहाला एकत्र करून बहुजनाचे राज्य चालविले. तोच विचार शाहू-फुले- आंबेडकर यांनी पुढे चालविला. तर माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी हाच विचार चालविला असून खा शरद पवार देखील तोच विचार पुढे घेऊन जात असल्याचे ठाम प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी दि.२ मार्च रोजी केले. 
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने राज्यातील २७ महानगरे व‌ ३५८ तालुक्यांमध्ये शरद युवा संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेनिमित्त धाराशिव येथील शिवगौरी फंक्शन हॉल व तुळजापूर येथील पुजारी मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष चंदन पाटील-नागराळकर, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणाताई सलगर, युवा सरचिटणीस आदित्य गोरे, प्रशांत बाबर, प्रदेश चिटणीस मसूद शेख, सुरेश पाटील, डॉ.प्रतापसिंह पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील-दुधगावकर, प्रदेश सचिव दिग्विजय शिंदे, योगेश सातपुते, दादा पाटील, संजय धूरगुडे, अक्षय परमेश्वर, रोचकरी, मृत्युंजय बनसोडे, रणवीर इंगळे, शहराध्यक्ष आयाज शेख, विशाल शिंगाडे, गोकुळ शिंदे, धैर्यशील पाटील, शकील भाई, विजय सर्जे, प्रशांत कवडे, शेखर घोडके, जिल्हा उपाध्यक्ष कादर खान, बाबा मुजावर, नितीन बागल , पृथ्वीराज आंधळे , आदी उपस्थित होते. 

पुढे बोलताना प्रदेशाध्यक्ष शेख म्हणाली की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व भक्त मंडळी देशात हिंदू-मुस्लिम व भारत-पाकिस्तान यावरून निवडणुकीच्या तोंडावर दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करीत आहेत. तर २०१४ च्या निवडणुक प्रचारादरम्यान मोदी भाजपची सत्ता आली तर साडेतीनशे रुपयांचा गॅस दीडशे रुपयाला देऊ, ७० रुपये लिटरचे पेट्रोल ३५ रुपये दराने देऊ व विदेशातील काळे धन आणून प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रुपये देऊ असे भाषणात म्हणताच केळी विकणारा घ्या केळी असे ओरडत होता. त्या केळीवाळ्याच्या ओरडल्याप्रमाणेच जनतेला मोदींनी केळी दिली आहेत. मात्र त्यांच्या भक्तमंडळींना अजूनही त्यांच्या खात्यावर पैसे येतील अशी खात्री असल्याचा टोला लगावला. तसेच २०१९ च्या निवडणुकीत लाव रे तो व्हिडिओ म्हणणारा‌ ईडीची नोटीस आल्यानंतर लाव रे‌ तो भोंगा असे म्हणू लागला अशी जहरी टीका राज ठाकरे यांच्यावर केली. तर या भोंगा प्रकरणावरून शिर्डी येथील साईबाबांची काकड आरती बंद केली होती. त्यावेळी मुस्लिम संघटनांनी सरकारला निवेदने देऊन भोंग्याची अजान बंद झाली तरी चालेल. परंतू काकड आरती सुरू झाली पाहिजे अशी मागणी केली व त्यानंतर काकड आरती सुरू झाली असल्याचे सांगितले. तसेच दुसरीकडे गृहमंत्री अमित शहा आ नवाब मलिक व खा आझम खान यांना जेलमध्ये टाकून मुस्लिम द्वेष पसरवित आहेत. मात्र एमआयएम हा पक्ष हिंदू मुस्लिम यांच्यातील दरी वाढवत असून तो भाजपला मदत करीत आहे. त्यामुळे त्या पक्षाबाबत कोणतीही कारवाई करीत नसून खा असदुद्दीन ओवेसी हे तुमचे जावई आहेत का ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून राष्ट्रवादी पुन्हा अशी गर्जना गावोगावी होऊ लागली आहे.


खा. शरद पवार यांनी ज्यांच्या खांद्यावर विश्वास टाकून दोन जिल्ह्याची जबाबदारी देऊन ४० वर्ष लाल दिवा दिला. तेच लोक पवार यांना सोडून दुसऱ्या पक्षात गेले ते आता एका मतदारसंघापूर्वी ते मर्यादित झाले आहेत. ते पूर्वी मालक होते. मात्र आता भाजपामध्ये सालगडी झाले असून खेकडा मंत्र्याच्या हाताखाली काम करण्याची वेळ त्यांच्यावर ओढावली आहे असा घणाघात केला. तुमच्यावर पवार यांनी विश्वास ठेवला पवार साहेबांना तुमची गरज होती. त्यावेळी तुम्ही भाजपात गेलात तर राज्यातील युवकांनी पवार साहेबांना साथ दिली. पावडर खाऊन तयार केलेली बॉडी, जमीन विकून आलेला पैसा राजकारणात व पवार साहेबांना सोडून गेलेली व्यक्ती राजकारणात जास्त काळ टिकत नसल्याचे सांगत  काय होतास तू, काय झालास तू वेड्या अशी झोंबणारी टिका केली. तसेच तुळजापूर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन गतिमान होऊन गावागावात प्रभागात पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून पक्ष संघटना मजबूत करावी व तुळजापूर मतदारसंघातून त्यांना घरची वाट दाखवावे असे आवाहन त्यांनी केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top