खासदार आरोपी असलेल्या चार वर्षांपूर्वीच्या ढवळे आत्महत्याप्रकरणी अद्याप सरकारी वकिल नाही? , पीडित कुटुंबाची सरकारी वकील नेमण्याची मागणी!
उस्मानाबाद : खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आरोपी असलेल्या चार वर्षांपूर्वीच्या शेतकरी दिलीप ढवळे आत्महत्याप्रकरणी अद्याप सरकारी वकिल नियुक्त करण्यात आलेला नाही. याप्रकरणात आम्हाला न्याय मिळण्याची आशा आहे. त्यासाठी सुनावणी तात्काळ सुरू करून सरकारी वकिल तात्काळ नियुक्त करण्यात यावा अशी मागणी पीडित ढवळे कुटुंबीयांच्या वतीने मुख्य जिल्हा सरकारी वकील शरद जाधवर यांच्याकडे करण्यात आली आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील शेतकरी दिलीप ढवळे यांनी एप्रिल 2019 मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आर्थिक फसवणूक केल्याने मानहानी सहन करावी लागली. चार एकर जमिनिचे ओमराजे निंबाळकर आणि विजय दंडनाईक या दोघांनी फसवणुकीतून केलेले गहाणखत यामुळे कुटुंबाचे प्रचंड हाल होत आहेत. या परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करत आहे असे सुसाईड नोटमध्ये दिलीप ढवळे यांनी लिहून ठेवले आणि शेताततील झाडाला गळफास घेतला. याप्रकरणी ढोकी पोलिस ठाण्यात घटनेच्या तब्बल पाच महिन्यांनी 14 सप्टेंबर 2019 मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
या प्रकरणी तीन वर्षांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाकडून 30 जुलै 2022 रोजी हे प्रकरण चालविण्यासाठी नोंदविण्यात आले. सध्या हे प्रकरण सत्र न्यायाधीश क्र. 1 यांच्या न्यायालयात प्रलंबित आहे. आणि या प्रकरणात 29 एप्रिल 2023 ही तारीख निश्चित आली आहे. या प्रकरणात अद्याप दोषारोपपत्र निश्चित करण्यात आले नसल्याचेही मयत दिलीप ढवळे यांच्या पत्नी वंदना ढवळे यांनी मुख्य जिल्हा सरकारी वकिलांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या प्रकरणातील आरोपी विद्यमान खासदार आहे. त्यांच्यासमवेत अन्य आरोपीही आहेत. त्यामुळे आम्हाला हे प्रकरण तात्काळ चालवून घ्यायचे आहे. सदर प्रकरणात आम्हाला न्याय मिळण्याची आशा आहे. त्यासाठी हे प्रकरण तात्काळ चालविण्यासाठी आमच्यावतीने महेंद्र देशमुख यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी. आणि 29 एप्रिल पूर्वी हे प्रकरण देशमुख यांच्याकडे सोपविण्यात यावे अशी मागणीही निवेदनाद्वारे वंदना ढवळे यांनी केली आहे.