जागतिक आरोग्य दिनानिमित्त "सुंदर माझा दवाखाना" उपक्रम
उस्मानाबाद,दि.06(प्रतिनिधी):- जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल 2023 निमित्ताने उस्मानाबाद जिल्हयातील उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात "सुंदर माझा दवाखाना " हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या वर्षीच्या जागतिक आरोग्य दिनाचे घोषवाक्य ' Health Equity, Health for all' असून या घोषवाक्याच्या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या रुग्णालयात तसेच आरोग्य संस्थेत सर्वांना समान सुविधा उपलब्ध आहेत आणि जास्तीत जास्त लोकांनी सार्वजनिक रुग्णालयाच्या सुविधांचा वापर केला पाहिजे याबाबत जनसामान्यात जनजागृती निर्माण करावयाची आहे. या दृष्टिने "सुंदर माझा दवाखाना" ही संकल्पना राबवण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी दिले आहेत. "
या संकल्पनेतून स्वच्छता दिन राबवून रुग्णालय, रुग्णालयाचा परिसर आदी स्वच्छ केल्यामुळे आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यास मदत होईल आणि रुग्णालयात आल्यावर प्रसन्न वातावरण अनुभवेल तसेच रुग्ण लवकरात लवकर बरे (निरोगी) होवून घरी जाण्यास मदत होईल.
या विशेष उपक्रमांतर्गत रुग्णालयातील व भोवतालचा परिसर, सर्व विभाग, स्वच्छतागृहे, भांडार गृहे आदींची विशेष स्वच्छता करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य संस्थांच्या आवारात व दर्शनिय भागात सुशोभीकरण, रंगरंगोटी करण्यात येणार आहे. आरोग्य संस्थेमार्फत जनतेला देण्यात येणाऱ्या सेवांची फलके लावण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व जनतेने शासकीय आरोग्य संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे-पाटील यांनी केले आहे.