Osmanabad news ,दि,11):- मागील दोन-तीन वर्षापासून पावसाची सुरुवात लवकर होऊन पाऊस दीर्घ काळ पडत असल्याने (नॉव्हेंबर डिसेंबरपर्यंत) गोगलगायीस पोषक वातावरण निर्माण झाले. साधारणतः सात ते आठ महिने जमिनीत ओलावी! असल्याने गोगलगायींच्या पिढ्यांमध्ये वाढ झाली व परिणामी संख्या भरमसाठ झाली. खरीप हंगामात लवकर पाऊस: पडल्याने मागील वर्षीच्या सुप्तावस्थेतील दोन्हीही पिढ्या (खरीप 2022 मध्ये) सक्रिय होऊन रोपवस्थेतील सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याचे आढळून आले.
चालु वर्षी देखील जिल्हयातील बऱ्याच भागात गोगलगायी आढळून येत आहेत. गोगलगाय नियंत्रणाबाबत कृषि विभागमार्फत गाव बैठका, पोस्टर्स, गोगलगाय नियंत्रण प्रात्यक्षिके तसेच गोगलगाय नियंत्रण रथ यांचे माध्यमातून व्यापक स्वरुपात प्रचार प्रसिद्धी व जनजागृतीचे काम करत आहे. प्रत्येक तालुक्यातून 2 गोगलगाय नियंत्रण रथ गावपातळीवर जनजागृती करण्यासाठी फिरविण्यात येत आहेत. आज 11 जुलै रोजी जिल्हाधिकारी यांचे हस्ते उस्मानाबाद तालुक्यांतील गोगलगाय नियंत्रण रथास हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
गोंगलगाय नियंत्रणासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.
→ संध्याकाळी व सुर्योदयापुर्वी बाहेर आलेल्या तसेच दिवसा झाडावर लपलेल्या गोगलगायी हाताने गोळा करुन मिठाच्या किंवा साबणाच्या द्रावणात बुडवाव्यात. त्यानंतर जमिनीत खड्डयात पुरुन टाकाव्यात किंवा रॉकेलमिश्रित पाण्यात बुडवून माराव्यात. शेतात ठरावीक अंतरावर गवताचे ढिग किंवा गोणपाट गुळाच्या पाण्याच्या द्रावणात बुडवून अंथरावेत. सकाळी गोणपाटाखाली गोळा झालेल्या गोगलगायी जमा करुन नष्ट कराव्यात.
गोगलगायला शेतात जाण्यास प्रतिबंध करण्यासाठी शेताभोवती चुन्याचा १० सेंमीचा पट्टा टाकण्यात यावा. गोगलगायीची अंडी ही खोडाशेजारील मुळाजवळ किंवा बांधाला तसेच गवताच्या ढिगाखाली 100 ते 200 च्या पुंजक्याने घातलेली असतात ही पांढरट, पिवळसर रंगाची साबुदाण्याच्या आकाराची असतात. ती हाताने गोळा करुन नष्ट करावीत जेणेकरुन पुढील हंगामात गोगलगायचा होणारा उद्रेक टाळता येईल.शेतकऱ्यांनी आरोग्यास होणारा धोका टाळणेसाठी हातमोजे व तोंडास मास्क घालावा.
अधिक माहितीसाठी गावातील कृषि सहाय्यक, मंडळ कृषि अधिकारी अथवा तालुका कृषि अधिकारी क़ार्यालयास संपर्क करावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. रविंद्र माने यांनी केले आहे.
******