ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रसूतीमध्ये वाढ
उस्मानाबाद - धाराशिव,दि.17(जिमाका) जिल्हातील सर्व गरोदर मातांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देवून शासकीय आरोग्य संस्थामधील प्रसूतीचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या सुचनेनुसार तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हातील सातत्याने प्रयत्न होत आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर दर महिन्याच्या 9 तारखेला प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान राबविण्यात येत आहे.यामध्ये प्रत्येक गरोदर मातेची सर्व तपासणी 5 वेळा केली जात आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण,उच्च रक्तदाब,वजन,उंची धनुर्वात प्रतिबंधक लसीचे डोस, लोहयुक्त गोळ्या,शरीरात जर लोहाची कमतरता खूपच असेल जसे कि हिमोग्लोबिन 10 ग्रॅमपेक्षा कमी असेल तर त्या गरोदर महिलेला इंजेक्शन आयर्न सुक्रोजच्या मात्रा दिल्या जात आहे.काही गुंतागुंत आढळून आल्यास पुढील संदर्भसेवा त्या महिलेला दिली जाते.तसेच त्या महिलेला संदर्भित करताना प्रा.आ.केंद्रातील एक जबाबदार व्यक्तीला त्या मातेसोबत पाठविण्यात येते.तसेच ज्या गरोदर महिलांना प्रा.आ.केंद्रात येणे शक्य होणार नाही अशा महिलांसाठी उपकेंद्रस्तरावर आरोग्य वर्धिनी मातृत्व दिन राबविला जातो.
तसेच ज्या गरोदर महिलांना घरगुती अडचणीमुळे प्रा.आ.केंद्रात किंवा उपकेंद्रात तपासणी करिता जाता येत नाही अशा गरोदर मातांसाठी ग्रामस्तरावर ग्राम मातृत्व दिन आयोजीत करून सर्व आरोग्य सेवा दिल्या जातात.ग्रामीण भागातील सर्व स्तरापर्यंत गरोदर मातांना सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातात.तसेच ह्या सेवा देताना सुरक्षित प्रसूतीसाठी नजीकच्या आरोग्य संस्थेत जाऊन प्रसूतीसाठी येण्याबाबतचे महत्व सांगून त्यांना प्रसूतीसाठी प्रवृत्त करण्यात येते.
दर महिन्याला गरोदर महिलांची अपेक्षित यादी काढून आशा व आरोग्य सेविका यांच्यामार्फत पाठपुरावा करून तसेच वैद्यकीय अधिकारी हे स्वत: काही निवडक गरोदर महिलांना नियमित फोन करून माहिती घेत आहेत.102 व 108 रुग्णवाहिकेचा योग्य वापर करण्यात येत आहे.तसेच प्रा.आ.केंद्र येथे गरोदर महिला प्रसूतीसाठी आल्यावर तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्या मातेची तपासणी करून प्रत्यक्ष समोर थांबूनच त्या महिलेची प्रसूती करुन घ्यावी अशा सूचना दिल्या आहेत. यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस.एल.हरिदास व जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी यांनी योग्य असे नियोजन करून दर आठवड्याला व दर महिन्याला बैठका घेऊन प्रा.आ. केंद्रातील प्रसुतीच्या संख्येत कशी वाढ होईल यासाठीचे योग्य मार्गदर्शन करून प्रसुतीच्या संख्येत सुधारणा करण्यात येत आहे.
माहे मे महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्याच्या प्रसूतीमध्ये लक्षणिय वाढ झालेली दिसून येत आहे.माहे मे 23 महिन्यामध्ये प्रा.आ. केंद्रस्तरावर एकूण 148 प्रसूती झालेल्या होत्या.आता माहे जून,जुलै ऑगष्ट,2023 मध्ये अनुक्रमे 165,983 व 248 प्रमाणे प्रसूतीमध्ये वाढ झाली आहे.
माहे सप्टेंबरमध्ये 261 प्रसुती झालेल्या आहेत.माहे मे 23 मध्ये दहापेक्षा अधिक प्रसूती झालेली एकच प्रा.आ.केंद्र होते.सप्टेंबरमध्ये वाढ होऊन 10 व त्यापेक्षा अधिक प्रसूती झालेल्या प्रा.आ.केंद्राची संख्या 7 वर गेली आहे. 5 ते 9 प्रसूती झालेल्या प्रा.आ.केंद्राची संख्या माहे मे मध्ये 12 होती.तर त्यामध्ये वाढ होऊन ती संख्या माहे सप्टेंबरमध्ये 23 झाली आहे.कमी काम असणाऱ्या (5 पेक्षा कमी प्रसूती) असणाऱ्या प्रा.आ. केंद्राची संख्या माहे मे मध्ये 31 होती.त्यामध्ये घट होऊन माहे सप्टेंबरमध्ये 14 वर आली आहे.
प्रसुतीच्या प्रा.आ. केंद्रस्तरावरील कामात सुधारणा होताना दिसून येत आहे.ह्या सुधारणा प्रा.आ.केंद्राच्या सेवेच्या दर्जामध्ये वाढ झाल्याने तसेच ओषधी उपलब्धता व पाठपुरावा वाढल्याने झाल्याचे दिसून येत आहे.तरी प्रसुतीच्या सेवेसाठी गरोदर महिलांनी नजीकच्या प्रा.आ. केंद्रास प्राधान्य द्यावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
****