डॉ.शकील अहमद खान यांचा कोरोना योद्धा म्हणून पालकमंत्री गडाख यांच्या हस्ते गौरव - Dr. Shakeel Ahmed Khan
Osmanabad - कोरोना महामारीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कोरोना योध्दा म्हणून उस्मानाबाद येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शकील अहमद खान यांचा महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा उस्मानाबाद जिह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
भारतीय प्रजासत्ताक दि (दि.26) रोजी तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभानंतर झालेल्या सन्मान सोहळ्यात वैद्यकीय अधिकारी डॉ.शकील अहमद खान यांना पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
उस्मानाबाद शहरात कोरोना महामारी काळात लॉकडाऊन सुरु झाल्यापासून त्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन कोरोना विषयी जनजागृती करुन जनतेला या महामारीपासून रोखण्यासाठी जनजागृती केली. शहरातील वेगवेगळ्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने तेथे जाऊन रुग्णाला कोविड सेंटरपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी पार पाडली. तसेच वेळोवेळी आरोग्य व पोलीस प्रशासनाच्या संपर्कात राहून परिस्थितीबाबत अवगत केले. या कार्याची दखल घेऊन प्रजासत्ताक दिन समारंभात वैद्यकीय अधिकारी डॉ. शकील अहमद खान यांचा पालकमंत्री श्री.गडाख यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड, पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नेवारे, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्यासह विविध मान्यवर, नागरिक उपस्थित होते.
डॉ. खान हे ऑल इंडिया युनानी वैद्यकीय संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदावरही कार्यरत असून फेब्रुवारी 2020 मध्ये त्यांना राष्ट्रीय पातळीवरील हकीम अब्दुल अजीज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल उस्मानाबाद जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धनंजय पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत वडगावे यांच्यासह जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.