पिक विम्याबाबत सर्वांचीच चालढकल : पुढील रणनीतीसाठी रविवारी बैठक. - आ. राणाजगजितसिंह पाटील. ( MLA Rana Jagjit Singh Patil )
Osmanabad :- जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक भागात ऑक्टोबर, २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले अधिकांश बाधित शेतकरी तांत्रिक कारणामुळे पिक विम्याच्या हक्काच्या नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य सरकारची भूमिका जाहीर करण्याचे आश्वासन कृषी मंत्री ना. दादाजी भुसे यांनी देवूनही अध्याप याबाबत ठोस कार्यवाही होताना दिसून येत नसल्याने आणि शासनाकडून चालढकल होत असल्यामुळे पुढील रणनीती ठरविण्यासाठी रविवारी सकाळी ११ वाजता शिंगोली सर्किट हाऊस, उस्मानाबाद येथे शेतकऱ्यांसमवेत बैठक घेण्याचे आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी ठरविले आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२० अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ९४८९९० अर्जाद्वारे ५१८०६५.५१ हेक्टर क्षेत्रासाठी रुपये २०५४१४.८९ लक्ष इतका विमा संरक्षित करून घेतला होता. त्यासाठी शेतकरी हिस्सा रुपये ४१८५.५९ लक्ष राज्य हिस्सा रुपये ३२२९५.४८ लक्ष आणि केंद्र हिस्सा रुपये २७४२१.८४ लक्ष असे एकूण रुपये ६३९०२.९१ लक्ष विमा हप्ता म्हणून विमा कंपनीस मिळाला आहे.
कृषी विभाग आणि विमा कंपनीच्या म्हणण्यानुसार अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी नंतर जिल्ह्यात एकूण ७९१२१ तक्रारी अर्ज विमा कंपनीकडे प्राप्त झाले असून त्यातील ६९२३१ अर्ज पात्र आहेत. त्यासाठी नुकसान भरपाई रक्कम ही रुपये ८३५६.८५ लक्ष मंजूर करण्यात आली होती पैकी जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत ४८४४२ अर्जदारांना रुपये ४९२१.५७ लक्ष इतकी रक्कम वाटप करण्यात आली असून २०७८९ अर्जदारांची रुपये ३४३५.२८ लक्ष इतकी रक्कम प्रलंबित आहे.
या उलट अतिवृष्टी व पुरामुळे अतोनात नुकसान झालेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय / राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारने काही प्रमाणात मदत केली. जिल्हा महसूल प्रशासनाने केलेल्या प्रक्रियेतून उमरगा, लोहारा, तुळजापूर व उस्मानाबाद या चार तालुक्याची व इतर तालुक्यातील काही गावांची पैसेवारी ५० च्या आत आली आहे. पिक विम्याशी संबंधित पिक कापणी प्रयोगातून जिल्ह्यात शेतमालाचे उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा जास्त असल्याने पिक विमा देय नाही असा निष्कर्ष कृषी विभागाने काढला आहे. परंतु प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये सहभागी झालेल्या अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे व ते या हक्काच्या नुकसान भरपाई पासून वंचित आहेत हे वास्तव असल्याची बाब आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी वारंवार शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.
या आधी विमा कंपनीने २४, ऑक्टोबर नंतर आलेले अर्ज गृहीत न धरण्याची भूमिका घेतली होती. या बाबत कृषी आयुक्त व विमा कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर उशिराने आलेले अर्ज ग्राह्य धरत अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसानीच्या अनुषंगाने रक्कम वर्ग करण्यात येत आहे. परंतु बहुतांश शेतकरी अर्जच करू न शकल्याने ते नूकसान भरपाई पासून वंचित राहत आहेत.
विमा कंपनीने अपात्र ठरविलेल्या तसेच अर्ज करू न शकलेल्या इतर वंचित शेतकऱ्यांना विमा मिळावा या अनुषंगाने कृषी मंत्री ना. दादाजी भुसे यांच्याकडे आ.राणाजगजितसिंह पाटील ( MLA Rana Jagjit Singh Patil ) साहेब यांनी दिनांक १२ जानेवारी रोजी तांत्रिक दोष निदर्शनास आणून देत प्रश्न उपस्थित करून शासनाने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती. शेतकऱ्यांना खरीप २०१९ मध्ये अशीच परिस्थिती असताना तत्कालीन मुख्यमंत्री ना. देवेन्द्रजी फडणवीस यांनी विमा कंपन्यांना सरसकट मदत करण्यास बाध्य केले होते, ही बाब देखील कृषी मंत्र्यांना अवगत केली होती. या अनुषंगाने सर्व बाबींची सखोल माहिती घेऊन दोन दिवसात भूमिका जाहीर करण्याचे आश्वासन ना. दादाजी भुसे यांनी दिले होते.
कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन सर्व शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळवून देतील अशी अपेक्षा होती परंतु अध्याप याबाबत शासनाकडून कसलाही निर्णय होताना दिसून येत नाही. विमा कंपनी करारातील अटींवर बोट ठेवून पैसे देण्यास असमर्थता दर्शवित आहे. यावर मंत्री महिदय व सचिव यांनी बैठका घेतल्या परंतु त्या निष्फळ ठरल्याचे दिसून येत आहे.
याबाबत आ. राणाजगजितसिंह पाटील ( MLA Rana Jagjit Singh Patil ) साहेबांनी काल कृषी विभागाचे सचिव श्री. एकनाथ डवले यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. अतिवृष्टीनंतर बाधित झालेल्या क्षेत्राचे जे काही उपग्रहाचे छायाचित्र उपलब्ध आहेत त्याच्या आधारे खरीप २०१९ च्या धरतीवर विमा कंपनीने नुकसान भरपाई द्यावी. विमा कंपनीस विमा हप्त्यापोटी मिळालेल्या रुपये ६३९०२.९१ लक्ष रकमे पैकी फक्त रुपये ८३५६.८५ लक्ष मंजूर करून वाटप करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांचे खरेच नुकसान झाले आहे म्हणून शास्त्रोक्त पद्धतीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी सूचना आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी त्यांच्याकडे केली. यासाठी कृषी विभागाचे सचिव श्री. एकनाथ डवले हे या आठवड्यात पिक विम्याबाबत बैठक घेणार आहेत.
या सर्व बाबींचा विचार करून पुढील रणनीती ठरविण्यासाठी रविवारी सकाळी ११ वाजता शिंगोली सर्किट हाऊस, उस्मानाबाद येथे शेतकऱ्यांसमवेत बैठक घेण्याचे आ. राणाजगजितसिंह पाटील ( MLA Rana Jagjit Singh Patil )
यांनी ठरविले आहे. या विषयाबाबत ज्या कोणास सूचना उपस्थित करायच्या आहेत त्यांनी आवर्जून या बैठकीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील साहेबांनी केले आहे.