जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध मागे मात्र कोविड अनुरूप वर्तन करणे अनिवार्य - जिल्हाधिकारी दिवेगावकर
Osmanabad news
उस्मानाबाद,दि.01():- राज्यामधील सर्व जिल्हे व प्रशासकीय घटकांमध्ये मागील काही आठवड्यांपासून कोविड-19 मुळे बाधित एकूण रुग्णसंख्या तसेच प्रतीदिवस आढळून येणारी बाधित रुग्णसंख्या प्रभावीपणे कमी झाल्याने तसेच केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने बाधित रुग्णसंख्येचा दर (पॉझिटीविटी रेट) आणि कोविड-19 रुग्णांच्या उपचारांसाठी वापरात असलेल्या बेड्सची संख्या (बेड्स ऑक्युपन्सी) या मापदंडांच्या मर्यादेत असल्याचे नमूद केले आहे.त्यामुळे जिल्ह्यातील कॉविड निर्बध मागे घेण्यात येत आहेत परंतु नागरिकानी कोविड अनुरूप वर्तन ठेवावे अशी घोषणा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी अज केली आहे.
कोविड-19 रुग्णसंख्या कमी झाली असल्याने आरोग्य सुविधांवरील ताण कमी झाला असल्याचे तसेच कोविड-19 च्या प्रतिबंधाचे अनुषंगाने सध्याची स्थिती नियंत्रणात आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 अन्वये लागू करण्यात आलेल्या सर्व आदेशांन्वये लागू केलेले सर्व निर्बंध मागे घेण्यात आले आहेत आणि 01 एप्रिल 2022 चे 00.00 वा. पासून पुढे अंमलात राहणार नाहीत. कोविड-19 चे व्यवस्थापन व प्रतिबंधाचे अनुषंगाने देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व सर्व संबंधित अधिकारी यांनी तंतोतंतपणे पालन करावे.जिल्ह्यातील सर्व नागरिक, आस्थापना व संस्था यांनी कोविड अनुरुप वर्तनाचे (ज्यामध्ये मास्कचा वापर, सामाजिक अंतराचे पालन इ. चा समावेश आहे) पालन करावे कारण ते व्यक्ती आणि समाजाचे आरोग्य व सुरक्षेकरिता सर्वात मोठी ढाल म्हणून कार्य करते.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने साथरोगाच्या उद्रेकाबाबतची विविध परिमाणे जसे की, प्रतिदिवशी आढळून येणाऱ्या नविन रुग्णांची संख्या, उपचाराधिन रुग्णांची संख्या (ॲक्टीव्ह केसेस), बाधित रुग्णसंख्येचा दर (पॉझिटीव्हीटी रेट) तसेच दवाखान्यांमध्ये उपराधिन रुग्णांकरिता वापरात असलेल्या विविध प्रकारच्या खाटांची संख्या याबाबत दक्ष रहावे. कोणत्याही परिस्थितीत रुग्णसंख्येचा कल यावरुन साथरोगाचा पुनश्च प्रादुर्भाव होण्याची स्थिती निर्माण होत असल्याचे दिसून आल्यास त्याबाबत राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास तात्काळ कळविण्यात यावे जेणेकरुन साथरोगाचा पुनश्च प्रादुर्भाव सुरुवातीच्या टप्प्यातच रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुरु करण्यात येतील.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व राज्य शासनाचे सर्व संबंधित विभागाचे अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांचे कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना व जनजागृतीचे कार्यक्रम (IEC ACTIVITIES) चालू ठेवावेत. हा आदेश दि. 01 एप्रिल 2022 रोजी 00.00 वा. पासून लागू होतील. असे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत.
कोविड अनुरूप वर्तन (CAB):-
व्याख्या:कोविड 19 विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी व्यक्ती आणि संस्थांना आवश्यक असलेले दैनंदिन सामान्य वर्तन म्हणून कोविड अनुरूप वर्तनाची व्याख्या केली जाऊ शकते ज्यामुळे साथरोग प्रसाराची साखळी खंडित होते. कोविड अनुरूप वर्तन म्हणून वैशिष्ट्यीकृत वर्तनांतर्गत खाली नमूद केलेल्या पैलूंचा समावेश आहे आणि अशा सर्व तर्कसंगत बाबी देखील समाविष्ट आहेत जे कोविड १९ विषाणूच्या प्रसारास अडथळा आणू शकतात त्याची कार्यपद्धती खालीलप्रमाणे असून सदर मूलभूत कोविड अनुरूप वर्तनांतर्गत सदर बाबींचे पालन सर्व संबंधितांनी करणे अनिवार्य आहे.
मास्कचा वापर नेहमी योग्य पद्धतीने करावा. मास्कने नेहमीच नाक आणि तोंड झाकले गेले पाहिजे.(रुमाल/गमचा/दुपट्टा इ. हा मुखपट्टी म्हणून मानला जाणार नाही आणि व्यक्ती नियमाप्रमाणे दंडास पात्र असेल.)जिथे शक्य असेल तिथे नेहमीच सामाजिक अंतर (6 फूट अंतर) राखावे.हात साबणाने किंवा सॅनिटायझरने वारंवार आणि स्वच्छ धुवावेत. हात सॅनिटायझरने धुतलेले नसल्यास हाताने नाक/डोळे/तोंडाला स्पर्श करणे टाळावे. श्वसनविषयक नियमांचे पालन करावे. वारंवार साफ केलेले पृष्ठभाग नियमितपणे स्वच्छ आणि निर्जंतुक करा. खोकताना किंवा शिंकताना टिश्यूचा वापर करावा आणि वापरलेले टिश्यू कचरापेटीमध्ये टाकावेत. जर, खोकताना किंवा शिंकताना एखाद्याकडे टिश्यू पेपर नसल्यास वाकलेल्या कोपरात शिंकावे, खोकताना किंवा शिंकताना तळहाताचा वापर करू नये. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये.अत्यावश्यक काम नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे. गर्दी टाळा आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतर (६ फूट अंतर) राखा. एकमेकांना भेटताना हस्तांदोलन टाळा व सुरक्षित अंतर राखूनच नमस्कार करावा. एकमेकांना भेटताना शारिरीक संपर्क टाळावा.