तुळजापूर येथे टू-व्हिलर पार्कींग आणि फेरीवाल्यांसाठी जागा निश्चित
उस्मानाबाद,दि.23(जिमाका):- तुळजाभवानी मंदिर संस्थान येथे पार्किंग वापराकरिता व फेरीवाले झोन म्हणून पुढीलप्रमाणे वापर करण्यात येणार आहे. या पार्कींग वापराची अंमलबजावणी दि.29 मे 2023 रोजी पासून अंमलात येणार आहे. या सूचनांचे पालन नागरिकांनी, व्यापारी, फेरीवाले व भाविकांनी करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी तुळजाभवानी मंदिर संस्थान येथे झालेल्या बैठकीत केले.
टू-व्हिलर पार्कींग करिता पंडित दीनदयाळ धर्मशाळा पाठीमागील भाजी मंडईची जागा (पुजारी वर्ग व स्थानिक, व्यापारी करिता), डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक रस्त्याच्या ठिकाणची सुनिल प्लाझा शॉपिंग सेन्टरच्या पाठीमागील जागा (स्थानिक व्यापारी आणि नागरिकांकरिता), घाटशिळ रोड येथील वन विभागाची जागा (भाविक व भक्तांसाठी), घाटशिळ पार्कींग समोरील समाज कल्याणची जागा (भाविक व भक्तांसाठी) जागा निश्चित करण्यात आली आहे.
फेरीवाल झोन हा भवानी रोड दीपक चौक ते खडकाळ गल्ली अमृतराव बोळ, कमान वेस, आर्य चौक पर्यंत ते उस्मानाबाद रोड आदी ठिकाणी फेरीवाला करिता प्रतिबंध करुन त्यांच्याकरिता घाटशिळ रोड तलाव समोरील 12 मीटर रुंद डी.पी.रस्त्याच्या दोन्ही बाजूस, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी चौक पर्यंत खुल्या जागेत, कमान वेस मारुती मंदिर समोर आणि खडकाळ गल्ली आठवडी बाजार या ठिकाणी जागा उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
वरीलप्रमाणे नमुद ठिकाणा व्यतिरिक्त इतर ठिकाणी वाहन थांबविल्यास किंवा फेरीवाले व्यापार करत असल्याचे आढळून आल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी यावेळी म्हणाले.