रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानाचे यशस्वी आयोजन
“रस्ता सुरक्षा नियमांकडे लक्ष द्या, स्वत:बरोबर इतरांनाही जगण्याची संधी द्या”- गजानन नेरपगार
उस्मानाबाद,दि.23(जिमाका):- रस्ता सुरक्षा सप्ताह (अभियान) 2023 उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि प्रजापती ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि.15 ते 21 मे 2023 हा सप्ताह जागतिक रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून पाळण्यात आला. शहरात विविध ठिकाणी माहिती पत्रके आणि दिशादर्शक चिन्ह असलेले पत्रके वाटप करुन, जनतेमध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती करण्यात आली.
दि.19 मे 2023 रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे दुपारी 12.00 वा.उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रजापती ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या ब्रम्हकुमार सुरेशभाई जगदाळे यांनी व्यसनमुक्ती, तणावमुक्ती आणि रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. तसेच ब्रम्हकुमारी अंजली दीदी यांनी मनशांती आणि मेडिटेशनचे महत्व विषद करुन उपस्थितांकडून मेडिटेशन करुन घेतले. सहायक मोटार वाहन निरीक्षक पुनम पोळ यांनी सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपले जीवन फार मोलाचे असून, रस्त्यावरील अपघाताचे प्रमाणात वाढ होत आहे. यामध्ये तरुणाईंची संख्या जास्त असल्यामुळे तरुणांनी रस्त्यावर वाहन चालवत असताना, वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेतलेच पाहिजे तसेच वाहतूक चिन्हांचे केले पाहिजे. हेल्मेट, सीट बेल्टचा वापर करावा, वाहन चालवतेवेळी मोबाईलचा वापर न करणे जेणेकरुन अपघातांमध्ये जीवित आणि वित्त हानी नक्कीच कमी होईल असे प्रतिपादन केले. यावेळी सहायक मोटार वाहन निरीक्षक विनोद लोणकर यांनी उपस्थितांना रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने शपथ दिली.
याप्रसंगी उस्मानाबाद कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक गौस शेख, प्रियदर्शनी उपासे, त्रिवेणी गालींदे आणि कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी, वाहन धारक, वाहन चालक, अनुज्ञप्ती काढण्याकरिता आलेले नागरिक, वाहन प्रशिक्षण संस्थाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सागर खटावकर यांनी तर आभार प्रदर्शन सुहेल मुजावर यांनी केले.