उपप्रादेशिक परिवहन विभागावर खाजगी व्यक्तींचा ताबा !
चॉईस नंबरसाठी जमादाडे खाजगी व्यक्तीची चॉईस
उस्मानाबाद दि.२५ (प्रतिनिधी) - येथील उपप्रादेशिक परिवहन विभागांतर्गत जिल्ह्यातील दोन चाकी, चार चाकी, सहा चाकी व मालवाहतुक तसेच बस आदी वाहने रस्त्यावर चालण्यासाठी अधिकृत परवाना दिला जातो. हे परवाना देण्याचे अधिकार अधिकृत शासकीय अधिकाऱ्यांना आहेत. मात्र या कार्यालयामध्ये शासकीय अधिकाऱ्याऐवजी...खास... खासगी व्यक्तींनी ताबा घेतला असून संबंधित वाहन चालकांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करून संबंधित अधिकाऱ्यांस देण्याचे काम कार्यालय प्रमुखाने अघोषित केलेले दलाल गेल्या अनेक वर्षापासून राजरोसपणे या कार्यालयात करीत आहेत. विशेष म्हणजे या पडताळणी केल्यानंतर संबंधित दलालाची बोलती बंद झाली असून त्यांनी तात्काळ खुर्ची व कार्यालय सोडून पळ काढला. त्यामुळे हे कार्यालय अनधिकृतपणे खाजगी व्यक्ती कोणाच्या आशिर्वादाने व सहमतीने चालवितात ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रत्येक जिल्ह्यासाठी शासनाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय सुरू केलेले आहे. या माध्यमातून त्या जिल्ह्यात २ चाकी, ४ चाकी, ६ चाकी, ८ चाकी, १० चाकी, १२ चाकी व १६ चाकी आदी वाहने रस्त्यावर वाहतुकीसाठी चालण्यास योग्य आहेत किंवा नाहीत ? याची प्रत्यक्ष पाहणी करून त्यासाठी अधिकृत परवाना दिला जातो. यामध्ये कंपनीने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे वाहनधारकांनी सर्व साहित्य व्यवस्थितरित्या बसविलेले आहे की अतिरिक्त आहे ? तसेच एखाद्या वाहनास जुना पार्ट बसविलेला आहे का याची खातरजमा केली जाते. विशेष म्हणजे ही वाहने जी व्यक्ती चालविणार आहे त्या व्यक्तींना परवाना देखील दिला जातो. त्यासाठी निकषाप्रमाणे वय, ठणठणीत आरोग्य असल्याचा सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांचा पुरावा याबरोबरच वाहतुकीच्या नियमांची माहिती आहे का नाही ? यासाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाते. त्यानंतरच वाहन चालकाचा परवाना दिला जातो. तर वाहन पासिंग करण्यासाठी वेगवेगळे चलन देखील शासकीय नियमानुसार भरून घेतले जाते. मात्र ते भरून घेण्याचे काम या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी करीत नाहीत. त्याऐवजी खासगी व्यक्ती त्या कार्यालयातील खुर्चीवर बसून कॉम्प्युटर हाताळत कोणाकडून किती पैसे घ्यायचे? ती रक्कम हाती आल्याशिवाय पुढील प्रक्रियाच करीत नाहीत. या कार्यालयातील कामकाज हे फक्त शासकीय कर्मचाऱ्यामार्फतच होणे बंधनकारक आहे. मात्र वसुलीतून वरकमाई करण्याची अधिकाऱ्यांची मानसिकता बरबटून गेलेली आहे. त्यामुळे वाहनधारक, वाहक व चालक यांच्याकडून मोठ्या आर्थिक रक्कम खाजगी व्यक्तिमार्फत घेण्याची जबाबदारी खाजगी व्यक्तींवर सोपविण्यात आल्याचे वास्तव समोर आले आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे खाजगी एजंटची ड्युटी सुरू ?
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात खाजगी व्यक्ती (एजंट) अधिकारी कर्मचारी यांच्याबरोबर कार्यालयात दररोज न चुकता येऊन ठरवून दिलेल्या टेबलवर दिवसभर बसतात. तर आलेल्या प्रत्येक ग्राहकांकडून भरमसाठ रक्कम वसूल करून आपली इमाने-इतबारे वरकमाई वसूल करून त्यापैकी ठरलेली रक्कम आपल्या साहेब (बॉस) ला संध्याकाळी पोहोच करतात. विशेष म्हणजे वेगवेगळ्या टेबलसाठी साहेबांनी देखील आपल्या मर्जीतील खास वेगवेगळी खाजगी व्यक्ती (एजंट) नेमलेले आहेत. त्यांनी फक्त दिलेली व सांगितलेली कामे न चुकता ठराविक रक्कम हाती आल्याशिवाय करायचीच नाहीत असा अलिखित दंडक घालून दिलेला आहे. त्यामुळे ते एजंट देखील बिनबोभाटपणे अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल करून साहेबाला खुश करीत आहेत.
चॉईस नंबरसाठी जमदाडेची चॉईस !
प्रत्येक वाहनांसाठी नंबरची सिरीयल ठरलेले आहे. तसेच पसंतीचा म्हणजेच चॉईस नंबर हवा असेल तर त्यासाठी देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. हे काम या कार्यालयामध्ये १३ नंबरच्या टेबलवरती केले जाते. या टेबलची जबाबदारी म्हणजे चॉईस नंबर देण्याची जबाबदारी तुळजापूर येथील जमदाडे मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या परमेश्वर जमदाडे या खाजगी व्यक्ती (एजंट) कडे दिलेली आहे. चॉईस नंबरसाठी आलेल्या प्रत्येक वाहनधारकांस जमदाडे त्याच्या मनात जो आकडा येईल तो सांगून त्याप्रमाणे रक्कम वसूल करून संबंधित वाहनधारकांच्या खिशाला भगदाड पाडण्याचे काम पंख्याखाली बसून शासकीय अधिकाऱ्याप्रमाणे रुबाबात करीत आहे.
काकाने आणला शिवणीकर नावाचा बोका
या कार्यालयांमधील सर्व आर्थिक देवाणघेवाणीचे काम क्लार्क म्हणून कार्यरत असलेले नरसिंग उर्फ काका कुलकर्णी करीत आहेत. त्यांनी आपल्या मदतीला सहाय्यक म्हणून आपलाच मेव्हुना प्रशांत शिवणीकर या नातेवाईक असलेल्या खाजगी व्यक्तीला या कार्यालयामध्ये मनमानीपणे व अनधिकृतपणे आणून बसविले आहे. शिवणीकरच्या माध्यमातून आलेल्या वाहनांच्या फायलीचा निपटारा करण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक फाईलवर नोटांचा बंडल ठेवल्याशिवाय फाईलला हात देखील ते लावीत नाहीत. जर फाईलवर वजन नसले तर त्यामध्ये वेगवेगळ्या त्रुटी काढून ती फाईल तशीच रखडवट ठेवण्याचे काम करीत आहेत. विशेष म्हणजे मनासारख्या नोटांच्या बंडलचे वजन ठेवल्याशिवाय अधिकारी व वाहनधारक यांच्यामध्ये शिवणीचा...धागा...घालण्याचे शिवणीकर करीत नाहीत. त्यांनी सांगितलेली रक्कम जर संबंधित व्यक्तीने त्यांच्याकडे जमा केली तर त्या फायलीचा लवकरात लवकर निपटारा करण्याचे काम हे महाशय करीत आहेत बघा हे विशेष.