उस्मानाबाद दि.३० (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजन पुरविण्यात येत आहे. मात्र यामध्ये ६७ को ५३ लाख ८० हजार ६१४ रुपयांचा आर्थिक महा घोटाळा केला आहे. अपहार केलेली घोटाळ्याची रक्कम वसूल करून संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच पुरवठा करण्यात येत असलेले मध्यान्ह भोजन तात्काळ थांबविण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव आनंद भालेराव यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांसह सर्व संबंधितांकडे एका निवेदनाद्वारे दि.३० मे रोजी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,
जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांचे २०२२ / उपचिटणीस / एमएजी- ४ /कावि-१६५९/१७४९ व दि. २८/०४/२०२३ रोजी चे पत्र (प्रत सलग्न) धाराशिव जिल्ह्यात मध्यान्ह भोजन योजनेत भ्रष्टाचार व महाघोटाळा झाला असून दि. १० फेब्रुवारी २०२२ पासून दि. ३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ६७ कोटी ५३ लाख ८० हजार ६१४ रुपये सरकारी कामगार अधिकारी यांनी खर्च करण्यात आले आहेत असा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशी समितीस सादर केला आहे. या जिल्ह्यातील मध्यान्ह भोजन योजनेबाबतची तपासणी उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांच्या मार्फत व स्वतः चौकशी समितीने दि. ६ ते १६ फेब्रुवारी २०२३ या कालावधी मध्ये जिल्हयातील ८८ मध्यान्ह भोजन केंद्राची तपासणी केली आहे. या तपासणीत प्रत्यक्ष कामावर असलेल्या मजुरांची एकूण संख्या (१५२०) इतकी दिसून आलेली आहे. तर कामगार विभागाकडे पुरवठादार संस्थेने सादर केलेल्या देयकाप्रमाणे भोजन पुरविण्यात आलेल्या मजुरांची संख्या (४३९१) इतकी आहे. प्रत्यक्ष संख्या व देयकानुसारची संख्या यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचे चौकशी समितीने अहवाल दिलेला आहे. तो अहवाल अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीचा अहवाल असून जा.क्र. २०२२ / उपचिटणीस/एमएजी- ४/कावि-१७४९/ दि. २८/०४/२०२३ नुसार यात भ्रष्टाचार झाल्याचा स्पष्ट अहवाल चौकशी समितीने सादर केला आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समितीचा तो अहवाल दि. २५/०४/२०२३ च्या पत्र क्र. २०२२ / उपचिटणीस/एमएजी-४/कावि-१६५९ / ९७४९ याद्वारे प्रधान सचिव, उद्योग, उर्जा व कामगार विभाग मंत्रालय मुंबई- ३२ आणि सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी म.इ.ब.इ.बां. का.क.म. मुंबई यांना सादर केला आहे.
जिल्ह्यात एवढा महाघोटाळा उघडकीस येऊन देखील मध्यान्ह भोजन योजना राजरोजपणे राबवली जात असून ती तात्काळ थांबवून येत्या १० दिवसांत दोषींवर गुन्हे दाखल करुन अपहार झालेली रक्कम वसूल करुन जिल्ह्यातील उर्वरित सर्व भोजन केंद्रांची तपासणी विशेष तपासणी व एसआयटी समितीकडून करण्यात यावी. अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल. विशेष म्हणजे
या प्रकरणामुळे आनंद भालेराव यांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मला शस्त्र परवाना व संरक्षण मिळावे अशी मागणी केली आहे. यावर भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव आनंद भालेराव, पुष्पकाते माळाळे, बालाजी झेंडे, रमेश घरबुडवे यांच्या सह्या आहेत.