पीक प्रात्यक्षिके व प्रमाणित बियाणे वितरण, मिनीकिट व मिलेट क्रॉप कॅपेटेरिया या बाबींचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा

0

पौष्टिक तृणधान्यासाठी मिनीकिटचे होणार वाटप

 

·        पीक प्रात्यक्षिके व प्रमाणित बियाणे वितरण, मिनीकिट व मिलेट क्रॉप कॅपेटेरिया या बाबींचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा

 

उस्मानाबाद,दि.17(जिमाका):-  जगात भरड धान्यांचे महत्त्व अबाधित ठेवून उत्पादन वाढविण्यासाठी जागतिक संघटनेने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष घोषित केले आहे. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याने पुढाकार घेत जिल्ह्यात शेत तिथे पौष्टिक तृणधान्य अंतर्गत 99 हजार 180  ( नव्यान्नव हजार एकशे ऐंशी ) मिनीकिटचे वाटप करणार आहेत. याबाबत कृषी विभागाने खरीप ज्वारी, बाजरी, राळा, कोडो आणि राजगिरा या भरडधान्यांचे मिनीकिट बियाणे मागवले आहेत.

तसेच या वर्षी 13 हजार 400 हेक्टर क्षेत्रावर तृणधान्यांची पेरणी करणार असल्याचे नियोजित आहे.

सन 2023-24 राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत पौष्टीक तृणधान्य या योजने अंतर्गत जिल्ह्यामध्ये 760 हेक्टर क्षेत्रावर आणि सन 2023-24 राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत महाराष्ट्र पौष्टीक तृणधान्य या योजनेअंतर्गत 160 हेक्टर क्षेत्रावर बाजरी पीक प्रात्यक्षिके तसेच 30 क्विंटल प्रमाणित बियाणे वितरण करण्यात येणार आहेत.

कृषी विभागाने शेत तिथे पौष्टिक तृणधान्ये या मोहिमेंतर्गत उस्मानाबाद उपविभागात 54 हजार 88 आणि भूम उपविभागात 45 हजार 92 मिनीकिट असे एकूण 99 हजार 180 मिनीकिटचे वितरण करण्यात येणार आहे. उस्मानाबाद कृषी कार्यालयाने महाबीज आणि राष्ट्रीय बियाणे महामंडळ यांच्याकडून बियाण्यांची मागणी केली आहे. या माध्यमातून जिल्ह्यात भरडधान्यांचे क्षेत्र वाढणार आहेत.

तसेच 2023-24 राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत पौष्टीक तृणधान्य या योजने अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये 2 मिलेट क्रॉप कॅपेटेरिया ( प्रत्येक 5 आर क्षेत्राचे ) याप्रमाणे 1 हजार 782 क्रॉप कॅपेटेरियाचे वितरण करण्यात येणार आहे. त्यामध्ये खरीप ज्वारी  1 आर क्षेत्रासाठी 100 ग्रॅम बियाणे, बाजरी 1 आर क्षेत्रासाठी 50 ग्रॅम बियाणे, नाचणी 1 आर क्षेत्रासाठी  50 ग्रॅम बियाणे, राळा 1 आर क्षेत्रासाठी 100 ग्रॅम बियाणे, कोडो 1/2 आर क्षेत्रासाठी 50 ग्रॅम बियाणे व राजगिरा 1/2 आर क्षेत्रासाठी 25 ग्रॅम बियाणे असे एकूण 375 ग्रॅम बियाणे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी उस्मानाबाद कृषी कार्यालयाने महाबीज यांच्याकडून बियाण्यांची मागणी केली आहे.

तरी पीक प्रात्यक्षिके व प्रमाणित बियाणे वितरण, मिनीकिट व मिलेट क्रॉप कॅपेटेरिया या बाबींचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top