सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी राज्याचा ५०% हिस्सा द्या. - आमदार राणाजगजितसिंह पाटील | Solapur-Tuljapur-Osmanabad Railway

0




सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी राज्याचा ५०% हिस्सा द्या. - आमदार राणाजगजितसिंह पाटील 


मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी. 

उस्मानाबाद, दि. २७ - उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर या रेल्वेमार्गामुळे देशातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या नकाशावर येणार आहे. त्याचबरोबर हा प्रकल्प जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्वाचा आहे.  वर्धा-यवतमाळ-नांदेड आणि अहमदनगर-बीड-परळी वैजिनाथ या रेल्वेमार्गाप्रमाणेच महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्राला रेल्वेशी जोडण्याकरिता या प्रकल्पाला लागणार्‍या खर्चाच्या ५० % हिस्सा राज्य सरकारने रेल्वे बोर्डास उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी तात्काळ धोरणात्मक निर्णय घेऊन त्याबाबतचे संमतीपत्र संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी केंद्र शासनास पाठवावे, अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी केली आहे.

राज्यातील आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत उस्मानाबाद आहे. मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या उस्मानाबादसह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळावी याकरिता मागील तीन दशकांपासून सोलापूर-जळगाव रेल्वेमार्ग सुरू करण्याची मागणी केली जात आहे. या नवीन रेल्वेमार्गाचे २००९ साली सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पश्चिम महाराष्ट्र या नवीन रेल्वेमार्गामुळे मराठवाड्याशी जोडला जाणार आहे. त्यातून मराठवाड्यातील पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे. हा रेल्वेमार्ग तुळजापूर मार्गे जात असल्याने देशभरातील नागरिकांना तुळजाभवानीच्या दर्शनाची सुविधा निर्माण होणार आहे व त्याबरोबरच देशभरातून तुळजापूर येथे भेट देणार्‍या भाविकांच्या संख्येत देखील लक्षणीय वाढ होणार आहे. तत्कालीन खासदार डॉ. पद्मसिंह पाटील साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे ४६८ किलोमीटर लांबीच्या या रेल्वेमार्गाचा प्रस्ताव अंतिम मंजुरी आणि निधी मिळविण्यासाठी २०१२ साली रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला होता.

या मार्गातील सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद असा नवा रेल्वेमार्गाचा प्रस्ताव हा पहिला टप्पा म्हणून पुढे आला. देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी साहेबांनी राज्यातील साडेतीन पीठांपैकी एक असलेले तुळजापूर हे धार्मिक पर्यटन क्षेत्र रेल्वेच्या नकाशावर आणण्याबाबत घोषणा केली होती. त्या अनुषंगाने केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नवीन रेल्वे मार्गाचा प्रस्ताव २२ जुलै २०१८ रोजी मंजूर केला आहे. रेल्वे मंत्रालयाच्या २०१८-१९ च्या नियोजनात देखील नव्या रेल्वेमार्गाचा समावेश करण्यात आला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मार्गाबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. असेही आमदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

सोलापूरहून तुळजापूर मार्गे उस्मानाबादला जाणार्‍या ८४.४४ किलोमीटर रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी रुपये ९०४.९२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. देशातील उस्मानाबादसारख्या आकांक्षित जिल्ह्याच्या विकासाला या रेल्वेमार्गामुळे मोठी चालना मिळणार आहे.

वर्धा-यवतमाळ-नांदेड आणि अहमदनगर-बीड-परळी वैजिनाथ या रेल्वे मार्गाच्या प्रकल्पासाठी लागणाऱ्या एकूण खर्चापैकी ५०% हिस्सा राज्य सरकारकडून केंद्रीय रेल्वे बोर्डास उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्याने मंत्रिमंडळ स्तरावर घेतलेला आहे, त्यानुसार सदर मार्गाकरिता राज्याने निधी उपलब्ध करून दिल्याने या मार्गाचे काम गतीने झाले व ते आता पूर्णत्वाकडे जात आहेत. याच धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणास्थान असलेल्या तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्राला रेल्वेमार्गाशी जोडण्याकरिता सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी लागणाऱ्या खर्चापैकी ५०% हिस्सा महाराष्ट्र शासनाने उचलावा यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र राज्य सरकारकडून याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही व नव्या रेल्वे मार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्यामुळे आ. पाटील यांनी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे की, महाराष्ट्र सरकारचे ५०% हिस्सा उचलण्याबाबतचे संमती पत्र रेल्वे बोर्डाकडे अद्याप उपलब्ध नाही. त्यासाठी रेल्वे रेल्वे बोर्डाचे दि.०८.०१.२०१९ चे संबंधित पत्र आणि मुख्य अभियंता, मध्य रेल्वे यांचे दि. ०८.०१.२०२१ चे पत्र सोबत पाठवून मुख्यमंत्र्यांना याबाबत अवगत केले आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्याचे अर्थकारण पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे व भौगोलिक रचनेमुळे इथे सतत दुष्काळी परिस्थिती असते. या परिसरात उद्योगधंदे नसल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचे प्रमाण आहे. इथल्या विकासाला चालना देण्यासाठी सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या रेल्वे मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यातील जनतेच्या आपल्याकडून मोठ्या अपेक्षा असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी यावेळी पत्रात नमूद केले आहे.

महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानीच्या तुळजापूर शहराला रेल्वेच्या नकाशावर आणण्यासाठी, या भागाच्या विकासाला चालना मिळावी यासाठी सोलापूरहून तुळजापूरमार्गे उस्मानाबादला जाणाऱ्‍या या ८४.४४ किलोमीटर रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठीच्या रुपये ९०४.९२ कोटींचा खर्चाचा ५० % हिस्सा राज्य शासनाने उचलण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन त्याबाबतचे संमतीपत्र संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी केंद्र शासनास पाठवावे अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी केली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top