क्रीडा विभागाच्या योजनांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
उस्मानाबाद.दि.29 (जिमाका):- राज्यामध्ये क्रीडा क्षेत्राचा विकास व्हावा तसेच सर्व नागरिकांचे आरोग्यमान चांगले राहावे यासाठी शासनाच्यावतीने क्रीडा आणि युवा धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. क्रीडा धोरणाच्या अनुषंगाने राज्यामध्ये विद्यार्थी आणि तरुणांसाठी व्यायामशाळा तसेच क्रीडांगणे विकसीत करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. त्यापैकीच व्यायामशाळा विकास अनुदान योजना आणि क्रीडांगण विकास अनुदान योजना आहेत. त्यासाठी प्रस्ताव 30 ऑगस्ट 2022 पर्यंत दाखल करण्याचे आवाहन क्रीडा विभागाने केले आहे.
व्यायामशाळा विकास अनुदान योजना आणि क्रीडांगण विकास अनुदान योजना या योजनांच्या माध्यमातून पात्र संस्थांना व्यायामशाळा साहीत्यासाठी आणि क्रीडांगणाच्या (क्रीडा साहित्य) विकासासाठी अनुदान मंजूर करण्यात येते.
*या योजनांची माहिती पुढीलप्रमाणे :*
*व्यायामशाळा विकास योजना -* जिल्हा वार्षिक योजनेतून व्यायामशाळा विकास (सर्वसाधारण आणि विशेष घटक योजनेकरिता) अंतर्गत किमान 500 चौ.फूट चटई क्षेत्राचे स्वतंत्र व्यायामगृह बांधणे या शिवाय बांधकामामध्ये कार्यालय, भांडारगृह, मुला- मुलींसाठी स्वच्छतागृह, प्रसाधनगृह आदी बाबींचा समावेश असावा. तसेच अत्याधुनिक व्यायाम साहित्याचा पुरवठा करणे, खुली व्यायामशाळा उभारणे (OPEN GYM) बाबीकरीता 7.00 लक्ष अनुदान मर्यादा आहे.
जिल्हयातील शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद, कॅन्टोनमेंट बोर्ड) शासकीय रुग्णालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग तसेच उच्च शिक्षण विभाग अल्पसंख्यांक विभागामार्फत चालविण्यात येणा-या सर्व शासकीय प्राथमिक,माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, आश्रमशाळा आणि वसतीगृह,शासकीय उपजिल्हा रुणालय, शासकीय रुग्णालय, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय तसेच शासनाद्वारे मान्यता दिलेल्या शैक्षणिक शाळा आणि महाविद्यालयांना शासनामार्फत अनुदान मिळण्यास प्रारंभ होवून 5 वर्ष पूर्ण झाले आहेत असे शाळा, महाविद्यालये आणि क्रीडा विभागाच्या विवधि समित्या तसेच पोलीस कल्याण निधी, पोलीस विभाग शासकीय कार्यालये, जिमखाना हे अनुदानासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
*क्रीडांगण विकास अनुदान योजना :*
उदयोन्मुख खेळाडूंना क्रीडा कौशल्य आणि क्रीडा गुण विकसीत करण्याची संधी उपलब्ध होण्यासाठी सुयोग्य क्रीडांगणाच्या मुलभूत सुविधा तयार होणे आवश्यक असल्यामुळे क्रीडांगण विकास अनुदान योजना कार्यान्वित आहे. क्रीडांगण विकास योजनेंतर्गत क्रीडांगण समपातळीत करणे, 200 मीटरचा धावनमार्ग तयार करणे, क्रीडांगणास भिंतीचे, तारेचे कुंपण घालणे, विविध खेळांची एक किंवा अधिक प्रमाणित क्रीडांगणे तयार करणे, प्रसाधनगृह, चेंजींग रूम बांधणे, पिण्याच्या आणि मैदानावर मारण्यासाठी आवश्यक पाण्याची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहित्य ठेवण्यासाठी भांडारगृह बांधणे, क्रीडांगणावर फ्लडलाईटची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहित्य खरेदी करणे, क्रीडांगणांवर मातीचा सिमेंटचा भराव असलेली प्रेक्षक गॅलरी आसन व्यवस्था तयार करणे, प्रेक्षक गॅलरीवर आसन व्यवस्थेवर शेड तयार करणे, क्रीडांगणाभोवती ड्रेनेज व्यवस्था करणे या बाबींकरिता जास्तीत जास्त सात लाख रुपये आणि क्रीडा साहित्य खरेदी करिता जास्तीत जास्त तीन लाख रुपये अनुदान देण्यात येते.
जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद, आदिवासी विकास आणि सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या सर्व शासकीय प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, आश्रमशाळा वसतीगृह, पोलीस कल्याण निधी, पोलीस विभाग, स्पोर्टस क्लब, ऑफिसर्स क्लब तसेच शासकीय महाविद्यालये, खाजगी शैक्षणिक संस्थेद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये ज्यांना शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. शासकीय कार्यालये , जिमखाना हे अनुदानासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. असे सर्व क्रीडांगण विकास अनुदान प्राप्त करण्यासाठी संस्थेकडे स्वत:च्या मालकीची अथवा दीर्घ मुदतीच्या (किमान 30 वर्षे) नोंदणीकृत भाडेपट्टा करारान्वये, बक्षिसपात्र, दानपत्रान्वये प्राप्त झालेली जागा असणे आवश्यक आहे.
संबंधितानी सर्वसाधारण तसेच विशेष घटक योजनेकरिता अर्ज करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून विहीत नमुन्यातील अर्ज परिपूर्ण प्रस्तावासह दि. 30 ऑगस्ट 2022 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.
*****