कुपोषण मुक्ती मिशन अंतर्गत आरोग्य तपासणी
उस्मानाबाद,दि.26(प्रतिनिधी ):- उस्मानाबाद हा जिल्हा आकांक्षित जिल्हा असल्याने जिल्हयातील कुपोषणाचे प्रमाण कमी करुन तो कुपोषण मुक्त करण्यासाठी दि.01 मे महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हयातील ग्रामीण व नागरी भागातील 2 हजार 53 अंगणवाडी केंद्रातील 6 वर्षाच्या आतील 1 लाख 23 हजार 543 बालकांची महिला व बाल विकास विभागामार्फत दि.01 ते 07 मे 2023 या कालावधीमध्ये वजन व उंची घेऊन बालकांचे श्रेणीनिहाय वर्गीकरण करण्यात आले आहे.
यामध्ये तीव्र कुपोषित (SAM) 191, मध्यम कुपोषित (MAM) 1 हजार 519 आणि सर्वसाधारण श्रेणीतील 1 लाख 13 हजार 794 बालके आढळून आली आहेत. यातील 1 हजार 710 बालकांची आरोग्य विभागामार्फत स्वंतत्र पथकाव्दारे माहे जून 2023 मध्ये संपूर्णपणे आरोग्य तपासणी करुन त्यांना औषधोपचार केला जाणार आहे. आरोग्य तपासणीमध्ये आढळून आलेल्या आजारी तीव्र कुपोषित (SAM) बालकांना NRC मध्ये दाखल करुन उपचार केला जाणार आहे. गंभीर वैद्यकीय दोष आढळलेल्या बालकांना संदर्भ सेवा देऊन वैद्यकीय उपचार केला जाणार आहे. जिल्हा कुपोषण मुक्त करण्यासाठी जिल्हा कृती दलाची स्थापना केलेली आहे. त्याचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी हे असून, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकीत्सक, शिक्षणाधिकारी, वैद्यकीय अधिकारी (आर.बी.एस.के.) हे सदस्य आहेत व उपमुख्य कार्यकारी अधिकारी,(बाक) हे सदस्य सचिव आहेत. कुपोषण मुक्त जिल्हा करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता यांनी कुपोषण मुक्ती मिशन हाती घेतले आहे, असे जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कळविले आहे.